महाराष्ट्र

मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन  व अध्ययन विधेयक विधानपरिषदेत एकमताने संमत

मुंबई, दि. 26 : मराठी भाषेला अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. मराठी भाषेचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हा खूप मोठा आहे. मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची भाषा असून आपण सर्वांनी मिळून ही भाषा जपली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,  असे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

मराठी शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन  व अध्ययन विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मांडले. हे विधेयक विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आले. या विधेयकाच्या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते. मराठी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा असून आज्ञापत्र  देणारी ही मराठी भाषा आहे. समाज म्हणजे काय, जगायचं कसं हे मराठी भाषेने शिकविले. इंग्रजांना वठणीवर आणणारी मराठी भाषा होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असे ठणकावून मराठी भाषेतूनच लोकमान्य टिळकांनी सांगितले. देशाची राज्यघटना लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे महात्मा फुले हेही मराठी होते हीच मराठीची शक्ती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कुठल्याही भाषेचा दुःस्वास करावा असे, शिकविले नाही. त्यामुळे मराठी भाषेच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या आपण जपल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजे. मराठीची संस्कृती आपण जपली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य  दिवाकर रावते, शरद रणपिसे, हेमंत टकले यांनी भाग घेतला.

Most Popular

To Top