महाराष्ट्र

पुणे येथे एव्हिएशन गॅलरीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन



प्रत्येक जिल्ह्यात एव्हिएशन गॅलरी उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार

 

पुणे, दि. ९ : राज्यातील विविध भागातील विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांना हवाई दल, या दलातील रोजगार संधींबाबतची माहिती करुन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एव्हिएशन गॅलरी उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

शिवाजीनगर गावठाण येथे नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या विकास निधीतून पूर्णत्वास आलेल्या सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी पुण्याचे हवाई दर्शनहा माहितीपट  दाखविण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्यात सर्वात आधी पुण्यात विविध नवनवीन प्रयोग राबविण्यात येतात. पुण्यात उभारण्यात आलेल्या या एव्हिएशन गॅलरीची संकल्पना कौतुकास्पद असून यामुळे लहान मुलांचे गगनभरारीचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी निश्चितच मदत होईल. वाहतूक कोंडीसह पुण्याच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. रिंग रोड, पुणे मेट्रो, विमानतळ, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आदी कामे लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.  जगभरात फैलावत असणाऱ्या कोरोनाचा संसर्ग राज्यात व देशात पसरु नये, यासाठी सर्वांनी हस्तांदोलन टाळावे तसेच सामाजिक शिष्टाचार पाळावेत, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, महानगरपालिकांनी नागरी सुविधा देण्याबरोबरच ट्रॅफिक पार्कसारख्या नवनवीन गोष्टींचं ज्ञान देणाऱ्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार होणे आवश्यक आहे, असे श्री. पाटील म्हणाले.

यावेळी महापौर श्री. मोहोळ यांनी पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहावे, यासाठी मदत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. आभार उपमहापौर श्रीमती शेंडगे यांनी मानले.

याठिकाणी जे.आर.डी. टाटा यांचे भित्तिचित्र, विमानांचा इतिहास, उड्डाणामागील विज्ञान आदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच विमानांच्या प्रतिकृती,  एरोमॉडेलिंग, पॅरामोटरिंग, अवकाश विज्ञान, हेलिकॉप्टर च्या प्रतिकृती, विमानतळ, भारतीय वायु सेना अशा विविध दालनांमध्ये विमाने व हेलिकॉप्टरच्या छोट्या व मोठ्या प्रतिकृती व हवाई दलातील रोजगार संधी बाबतची माहिती देण्यात आली आहे.

Most Popular

To Top