मुंबई, दि. 12 : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून मार्केट यार्डमध्ये भाजीचा व्यापार करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना रोजगारापासून वंचित ठेवू नका. परवाना आणि गाळे वाटपाबाबत उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणी भाजी विक्रेत्यांची बाजू भक्कमपणे मांडण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासन आणि संघटनांना दिल्या.
विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून अनेक किरकोळ भाजी विक्रेते तेथे व्यवसाय करीत आहेत. त्यांचा पूर्वीपासूनचा हा व्यवसाय असल्यामुळे तेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या गाळे वाटपाचे प्रकरण न्यायालयीन असले, तरी या व्यापाऱ्यांना रोजगारापासून वंचित ठेवता येणार नाही. किरकोळ भाजी विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना देण्यात येतील, असे श्री.पटोले यांनी सांगितले.
बैठकीला पणन संचालक, पणन विभागाचे उपसचिव, जिल्हा उपनिबंधक, एपीएमसी नागपूरचे सचिव आणि चिल्लर विक्रेता असोसिएशन नागपूरचे पदाधिकारी उपस्थित होते.
