महाराष्ट्र

तांत्रिक कारणास्तव कामे रखडणार नाहीत याकडे लक्ष देण्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश


पोलादपूर तालुक्यातील जलसंधारण कामांचा आढावा

मुंबई, दि. 13 : तांत्रिक कारणास्तव कामे रखडल्यास कामांची किंमत वाढण्यासह लोकांनाही अडचणींना सामोरे जावे लागते असे सांगून पोलादपूर (जि. रायगड) तालुक्यातील जलसंधारण कामे गतीने पूर्णत्वास येण्याच्या दृष्टीने भूसंपादनासाठी मूल्यांकनाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करुन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

पोलादपूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांचा आढावा श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी ठाण्याचे जलसंधारण महामंडळाचे प्रादेशिक अधीक्षक अभियंता एस. एस. खांडेकर, कार्यकारी अभियंता अमोल फुंदे आदी उपस्थित होते.

लोककल्याणाशी निगडित असलेली कामे गतीने पूर्ण केली पाहिजेत, असे सांगून श्री. भरणे यांनी किन्हेश्वरवाडी, लोहारखोंडा, कोतवाल गाव या लघुपाटबंधारे योजना तसेच कोंढवी साठवण तलावाच्या कामासाठी प्रलंबित भूसंपादनाच्या मूल्यांकनाचे प्रस्तावावर कार्यवाही करुन ही कामे गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश दिले.

सडवली आणि तुटवली परिसरातील सिमेंट नाला बंधाऱ्यांची सुरू असलेली 8 कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन या पावसाळ्यात पाणीसाठा करावा, अशा सूचनाही श्री. भरणे यांनी यावेळी दिल्या.

००००

सचिन गाढवे/ वि.सं.अ./दि. 13.3.2020

Most Popular

To Top