महाराष्ट्र

जलजागृती अभियान : जलस्त्रोतांची जपणूक महत्त्वाची – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि. 16 : संपूर्ण जगात कोरोनाची साथ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिक जागृत आहेत. ही बाब महत्त्वाची असून नागरिकांनी जलजागृती अभियानाबाबतही सजगता दाखवून जलस्त्रोतांची सक्रियपणे जपणूक करावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

नैसर्गिक व मानवनिर्मित जलस्त्रोतांची जपणूक आपलेपणाने व्हावी, याबाबत लोकसहभागाबाबतची जागृती वाढविण्याच्या भूमिकेतून राज्यात जलजागृतीबाबत दिनांक 16 ते 22 मार्च या काळात अभियान राबविण्यात येत आहे. या जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने घरगुती, उद्योगधंद्यातील आणि शेतीसह हॉटेलपर्यटन व्यवसायात काटकसरीने पाणी वापर करण्याचा आचारविचार रुजवायचा आहे. 

महाराष्ट्र राज्याचा विचार करता, राज्याच्या 307 लक्ष हेक्टर क्षेत्रफळापैकी लागवड योग्य क्षेत्रफळ 225 एवढे आहे. त्यापैकी 50.36 एवढ्या क्षेत्राला सिंचन प्रकल्पाचे पाणी लाभते आहे. आपल्या राज्याला गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा आणि पश्चिम वाहिनी नद्यांची जलसंपत्ती लाभलेली आहे. या जलसंपत्तीची जोपासना करणे आपले कर्तव्य आहे, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

राज्यातील जलसंपदा वाढविण्यासाठी शासनाकडून चालू व पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. तसेच राज्यातील नदीजोड प्रकल्प स्वबळावर पूर्ण करुन नेहमीच दुष्काळ असलेल्या मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविणे, मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी बंद नलिका पाणी पुरवठा प्रणाली पूर्ण करणे. पाण्याचा पुनर्वापर तसेच पाण्याच्या पुनर्भरणाची व्याप्ती वाढविणे. हवाई सर्वेक्षणाच्या सहाय्याने अचूक सिंचन क्षेत्र निश्चित करणे. सिंचनासंबंधीचा प्रादेशिक अनुशेष दूर करणे, जलविद्युत ऊर्जा निर्माण करणे अशी कामे सुरु आहेत.

महत्त्वाचे म्हणजे पूर व हवामान बदलाचे संकेत तातडीने मिळण्याची व्यवस्था करणे. धरण पुनर्स्थापना व वितरण प्रणाली दुरुस्तीचे काम पूर्ण करुन प्रत्यक्ष सिंचनात वाढ करणे. सिंचन प्रकल्पाचे क्षेत्र पर्यटनस्थळे व्हावीत व त्या उत्पन्नातून देखभालीचा खर्च भागावा यासाठी पायाभूत उभारणी करणे ही कामे देखील सुरु आहेत.

जलजागृती सप्ताहाच्या प्रेरणेतून महाराष्ट्राला सर्वार्थाने सुजलाम् सुफलाम् करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष कार्यानेच पूर्ण होणार आहे. आपल्या परिसराचे पाणी, पीक व पर्यावरणाचे ज्ञान, सामुहिक समन्वयाने आराखडा आणि शास्त्रशुद्ध कृती या चार तत्त्वांवर हे व्रत आपण अंगिकारल्यास भविष्यातील पिढ्या आनंदाने जलसमृद्धीत नांदू शकतील, असे आवाहन जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.

000

Most Popular

To Top