महाराष्ट्र

कोरोनाचा मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी १ नवा रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४१ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


मुंबईत ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबई, दि. १७ : राज्यात आज मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याची एकूण रुग्ण संख्या ४१ झाली आहे. आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

दुबईहून ५ मार्चला परतलेल्या ६४ वर्षीय उच्च रक्तदाबाचा त्रास असलेला हा रुग्ण हिंदूजा रुग्णालयातून संदर्भित करण्यात आला होता. 

दरम्यान, आज  राज्यात आणखी २ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एक रुग्ण मुंबईचा असून हा ४९ वर्षाचा तरुण ७ मार्च रोजी अमेरिकेवरुन परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण हा पिंपरी चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून हा २६ वर्षीय तरुण १४ मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे.  

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : पिंपरी चिंचवड मनपा १० , पुणे मनपा ७, मुंबई  , नागपूर ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी ३, आणि रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद  येथे प्रत्येकी १ असे एकूण ४१.

      

राज्यात आज १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ११६९  प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ९०० जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ११६९ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. 

दरम्यान, काल आणि आज राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्था नवी दिल्ली येथील तज्ञ पथकाने पुणे येथे भेट देऊन येथील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. 

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४  टोल फ्री  क्रमांक १०४

00000

अजय जाधव..१७.३.२०२०

Most Popular

To Top