महाराष्ट्र

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती नाही – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई, दि. १८ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालये दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईपर्यंत वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठे आणि महविद्यालयांना दिल्या.

श्री.सामंत म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठे,  महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावी जाण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. परंतू, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात, त्यांना गावी जाण्यासाठी तिकीट उपलब्ध होईपर्यंत वसतिगृहात थांबू द्यावे. विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यावे आणि त्यांची गैरसोय होता कामा नये, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.

परदेशी विद्यार्थी आणि ज्या मुलांना गावी जाणे तत्काळ शक्य नाही असे विद्यार्थी वसतिगृहात राहत असतील तर त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सहकार्य करावे, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

००००

Most Popular

To Top