महाराष्ट्र

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आवाहन

मुंबई, दि.२१ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. शासन निर्णयाद्वारे ह्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनामार्फत कळविण्यात आल्या आहेत. सर्वांनी घरीच थांबून या रोगाचा संभाव्य प्रसार थांबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.  

होम क्वारंटाईन केलेले काही लोक सर्रास घराबाहेर पडून हे प्रतिबंध मोडीत आहेत. याकरिता सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, होम क्वारंटाईन केलेली कोणीही व्यक्ती अशाप्रकारे प्रतिबंध असतांना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची माहिती ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांचेमार्फत पोलिसांना द्यावी. नागरी भागात नगरपालिका मुख्याधिकारी यांनी अशा होम क्वारंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवावे व अशा प्रकारे प्रतिबंधांचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर आवश्यक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांना माहिती द्यावी व कारवाई करावी. लग्नसमारंभ आणि इतर सोहळे यापासून लोक दूर राहत असले तरी अंतिम संस्कार व रक्षा विसर्जन अशा कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणीसुद्धा संयम बाळगून व परिस्थितीचा विचार करून गर्दी टाळावी.

हा आठवडा व या पुढील काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याने या प्रतिबंधात्मक सूचनांचे कठोरपणे पालन करावे.

कोरोनासंदर्भातील या युद्धास सहकार्य करून आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी बंधने पाळावीत असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.

Most Popular

To Top