महाराष्ट्र

ग्राहकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याबाबत घाबरुन जाऊ नये – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत सुरू राहील

मुंबई, दि. 26 : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत सुरू राहील. ग्राहकांनी मार्केटमध्ये, दुकानात गर्दी करू नये, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, खरेदीसाठी ग्राहक अनेक ठिकाणी गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गर्दी टाळण्यासाठी मुंबई व पुणे शहरात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून  सभासदांना भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू गृहनिर्माण संस्थेपर्यंत पुरवठा करण्याबाबत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनामार्फत व्यवस्था करण्यात आली आहे.

याअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना आवश्यक असणारा भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तुंची मागणी एकत्र करुन पुरवठादाराकडे नोंदविणे व त्यानुसार पुरवठादाराने थेट सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात या वस्तुंचा पुरवठा करण्याबाबत मुंबई शहरातील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रकारची व्यवस्था महानगरपालिका असलेल्या अन्य शहरात देखील तातडीने सुरु करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना  देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात प्रामुख्याने मुंबई व पुणे या प्रमुख बाजार समित्यांमध्ये सर्व संबंधित घटकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत भाजीपाला, फळे व अन्य जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित चालू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्यातील सुमारे 240 बाजार समित्यांमधील आवक व विक्री व्यवस्था सुरु आहे. तसेच पुणे व नाशिक शहराच्या विविध भागात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत आठवडे बाजार सुरु करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. या वस्तुंच्या पुरवठा साखळीशी संबंधित महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व अन्न व नागरी पुरवठा विभागास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याबाबत सहकार व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. 

जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याबाबत ग्राहकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने राज्यातील विविध बाजार समित्यांनी  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून नियोजन करावे, अशा सूचनाही  देण्यात  आल्या असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

०००००

Most Popular

To Top