महाराष्ट्र

‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या अस्तित्वासाठी: सत्तारुढ, विरोधी पक्षांसह जनतेची एकजूट महत्त्वाची – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 30 :- ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी सत्तारुढ, विरोधीपक्षांसह तमाम जनतेची एकजूट महत्त्वाची आहे. ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या सीमेपलीकडचा मानवजातीच्या अस्तित्वाचा लढा असल्यानं या लढाईत एकजूटीने, एकाच दिशेने प्रयत्नांची गरज आहे. वैयक्तिक स्वार्थ, पक्षीय मतभेद तूर्तास बाजूला ठेवून ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात सर्वजण एकजूटीने प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाधित रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगून यापुढचे दोन आठवडे नागरिकांनी भेटीगाठी, गर्दी टाळून घरातच थांबावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्रात काम करणाऱ्या परराज्यातील मजूरांनी जीव धोक्यात घालून प्रवास करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. परराज्यातील मजुरांसाठी राज्यात ठिकठिकाणी शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. मजुरांच्या गरजेनुसार आता जिथे ते आहेत त्याठिकाणी प्रशासनातर्फे निवास आणि भोजनाची मोफत सोय करण्यात येत आहे. प्रशासनाच्या बरोबरीनं स्वयंसेवी संस्थां त्यासाठी योगदान देत आहेत. राज्यात शिवभोजन थाळी योजनेची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पुढचे तीन महिने शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना उपलब्ध करण्यात येत आहे. त्यातूनही गरीबांचे पोट भरण्यास मदत होणार आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Most Popular

To Top