महाराष्ट्र

निलंग्यात आढळलेल्या आठ कोवीड पॉझिटिव्हच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 4 – निलंगा येथील आढळलेल्या 8 कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात हरियाणा ते लातूर-निलंगा पर्यंतच्या प्रवासात संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेण्याचे काम राज्य शासनातर्फे सुरू असून त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

हरियाणा राज्याच्या नुह जिल्ह्यातील फिरोजपुर झिरका येथे गेल्या तीन महिन्यापासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले बारा यात्रेकरू दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. या बारा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील आठ जण कोवीड पॉझिटिव्ह असल्याचे तपासणी नंतर लक्षात आले आहे. या कोवीड पॉझिटिव्ह रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  तर अन्य चार जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन याबाबत सविस्तर माहिती घेत आहे.

या सर्व यात्रेकरूंवर तसेच अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या  यात्रेकरूंवर उपचार करताना  पुरेशी काळजी घेण्यात यावी  आणि कोणत्याही परिस्थितीत याची कुणालाही लागण होणार नाही  याबाबतची  दक्षता घेण्याचे आणि या सर्वांवर उपचार करून लॉकडाऊन नंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

Most Popular

To Top