महाराष्ट्र

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रारी स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष सुरू


राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

मुंबई दि. 5:  अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24×7 सुरू करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

24 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान 1,357 गुन्ह्याची नोंद,  39 वाहने जप्त,

514 आरोपींना अटक  तर 3 कोटी 34 लाख 84 हजारहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

दिनांक 24 मार्च 2020 ते दिनांक 4 एप्रिल 2020 या कालावधीत राज्यात एकूण  1357 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात  39 वाहने जप्त करण्यात आली असून 514 आरोपींना अटक  करण्यात आले आहे.  एकूण  3 कोटी, 34 लाख, 84 हजार, 242 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  काल दिनांक 4 एप्रिल 2020 रोजी एका दिवसात 136 गुन्हे नोंदविण्यात आले असून अवैध मद्य वाहतूक करणारी 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात  दिनांक 24 मार्च 2020 पासून कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील  मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री  दिलीप वळसे -पाटील  यांच्या निर्देशानुसार प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क तसेच राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री. कांतीलाल उमाप  यांनी महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उपायुक्त तसेच संबंधित जिल्ह्याच्या अधीक्षकांना नाकाबंदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच राज्यात हातभट्टी / अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध नियंत्रणात्मक कारवाई करण्याचे व गुन्हे नोंदविण्याचे निर्देश दिलेले आहेत.

आज दिनांक 5 एप्रिल रोजी आयुक्तांनी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे विभागातील सर्व विभागीय उपायुक्तांची विशेष बैठक घेतली.  बैठकीदरम्यान आयुक्तांनी वरील प्रकारे हातभट्टी अथवा अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या व्यक्तींना कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हे नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ग्राम आणि तालुका पातळीवरील इतर शासकीय प्राधिकरण यांची मदत घेऊन अवैध मद्य निर्मिती चे नवीन ठिकाण तयार झाले असल्यास त्याबाबतही माहिती घेण्याचे निर्देश दिले. शासनाच्या लॉक डाऊन काळात संबंधित अधिसूचनेचा भंग करून अवैध मद्यनिर्मिती व वाहतूक करणाऱ्या, त्यांना कच्चामाल व अन्य आनुषंगिक साहित्य पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध  साथीचे रोग  कायदा 1897,  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये देखील गुन्हे दाखल करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याचे  निर्देश दिले आहेत.

तसेच गोवा, दादरा- नगर हवेली, दीव- दमण, कर्नाटक व मध्य प्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता 12 कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाके आणि नव्याने उभारण्यात आलेले 18 तात्पुरते सीमा तपासणी नाके  येथे अधिकारी-कर्मचारी यांना तैनात करून पूर्णपणे  नाकाबंदी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक  १८००८३३३३३३,  व्हाट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ व ई-मेल आयडी commstateexcise@gmail.com आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्या चे नाव गोपनीय ठेवण्यात येते. वरील नमूद क्रमांकावर अवैध मद्याबाबतची तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Most Popular

To Top