महाराष्ट्र

मार्डच्या मागण्यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून तत्काळ दखल

मास्क, पीपीई किट उपलब्ध 

औरंगाबाद, दिनांक 05 (जिमाका) : कोवीड-19 रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी) दाखल होऊ लागल्याने एन-95 मास्क, पीपीई किट मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत वेळीच दखल घेतलेली आहे आणि एन ९५ मास्क व पीपीई किट उपलब्ध करून दिलेले आहेत, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथील मार्ड पदाधिकारी यांनी अधिष्ठाता यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे मांडले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड उपस्थित होते.

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार फिवर ओपीडी, अपघात विभाग, आयसोलेशन वार्ड, कोविड-१९ वार्ड येथे एन-95 मास्क व पीपीई किट मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. सदरचे एन-95 मास्क व पीपीई किट संबंधित वॉर्डात मुबलक प्रमाणात देण्यात येईल, याची जबाबदारी संबंधित वॉर्डातील मुख्य परिचारिका (इंचार्ज सिस्टर) किंवा कर्तव्यावर हजर असलेल्या परिचारिकेकडे सोपविलेली आहे. डॉक्टरांना  एन-95 मास्क व पीपीई किटची आवश्यकता असेल, त्यावेळी त्यांनी वॉर्डातील परिचारिका यांच्याकडे मागणी करावी.  त्यांना एन-95 मास्क व पीपीई किट संबंधित परिचारिकेकडून पुरविण्यात येईल, असे मार्डच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर पदाधिकाऱ्यांचे समाधान झाल्याने त्यांनी आभार मानले.

0000

Most Popular

To Top