शासनाने घालून दिलेल्या वैयक्तिक स्वच्छता, संचारबंदी व सोशल डिस्टसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करत पिंपळगाव (बसवंत) ‘हिरकणी’ महिला समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडत आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘कोरोना’ विरूद्ध ग्रामीण महिलांच्या लढ्याची यशोगाथा…
बचत गट म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सामर्थ्य निर्माण करून देणारी शक्ती आहे. या बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला एकत्र येऊन नवनवीन उद्योग उभारत आहेत. तसेच अनेक विविध दैनंदिन उपयोगात येणाऱ्या वस्तू, पदार्थ, शोभिवंत वस्तू अशांची निर्मिती केली जाते. या माध्यमातूनच या महिला स्वतःसोबतच कुटुंबालादेखील आर्थिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्याच्या परिस्थितीत या बचत गटांच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपण पाहतो आहे. घरापर्यंत किंवा लहान उद्योग व्यवसाय करण्यापर्यंत हे महिला बचत गट मर्यादित राहिले नसून आज सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून काम करताना बघायला मिळतात.
जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या गावातील असाच एक ‘स्वागत हिरकणी उद्योग गट’. साधारण सात महिन्यापूर्वी गावातील वेगवेगळ्या 14 ते 15 महिला बचत गटांनी एकत्र येऊन ‘स्वागत महिला ग्राम संघ’ तयार केला. या ग्राम संघातील पंधरा-वीस महिलांना एकत्र आणून दोन महिन्यापूर्वी ‘स्वागत हिरकणी उद्योग गट’ तयार करण्यात आला. सुरुवातीला या या गटाला पंचायत समितीतर्फे दोन लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. या प्राप्त अनुदानातून या महिला उद्योग गटाने सहा नवीन शिलाई मशीनची खरेदी केली आणि प्लास्टिकमुक्त अभियानाला हातभार लावण्यासाठी या महिला गटामार्फत कागदी व कापडी पिशव्यांची निर्मिती करण्याचे काम सुरू झाले.
काही दिवसांपासून जगभरात कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. या रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्व पातळीवरून खबरदारीच्या आवश्यक त्या उपायोजना सुरू आहेत. प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीने शक्य आहे त्या स्वरूपात आपला सहभाग देत आहे. अशा आपत्तीच्या परिस्थितीत ‘सॅनिटायझर व मास्क’ या दोन वस्तूंचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. स्वागत हिरकणी महिला उद्योग गटामार्फत या आपत्कालीन परिस्थितीत सामाजिक जाणीव ठेवून या उद्योग गटाने मास्क बनवण्याचे काम सुरू केले. सर्वप्रथम ‘कल्याणी स्वयंसेवी संस्थे’मार्फत या उद्योग गटाला 25 हजार कापडी मास्क बनवण्याचे काम मिळाले. हे काम अतिशय नियोजनपूर्वक आणि जबाबदारीने वेळेत पूर्ण करण्यात त्यांना यश मिळाले. यानंतर लगेच या गटाला गावातीलच मेडिकल दुकानदारांकडून साधारण दहा हजार मास्क तयार करून देण्याची मागणी करण्यात आली आणि ती देखील या गटाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. आता या बचत गटातील महिला अजूनही 50 हजार मास्क तयार करण्याचे काम ना नफा ना तोटा या तत्त्वावर स्वीकारत आहेत. समाजभान राखत वेळेत आणि नियोजनपूर्वक हे काम करत असताना आता या उद्योग समूहाला शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्याचे काम देखील मिळाले आहे; आणि लवकरच मास्क बनविण्याबरोबरच ते शिवभोजन केंद्र सुरु करणार आहे.
आपत्ती व संचार बंदीच्या काळात समाजाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून या स्वागत हिरकणी उद्योग गटाच्या महिलांनी मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. कोरोना या साथरोगाला आळा घालण्यासाठी मास्कचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. आपले हे सामाजिक कर्तव्य पार पाडत असतांना ग्रामपंचायतीमार्फत या स्वागत हिरकणी महिला ग्राम संघासाठी एक हॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शासनाने घालून दिलेल्या वैयक्तिक स्वच्छता, संचारबंदी व सोशल डिस्टसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करत या महिला समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मास्क तयार करण्याचे काम करत असताना ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध असलेल्या हॉलमध्ये चार ते पाच महिला मास्क कटिंगचे काम करतात व त्यानंतर कटिंग केलेले मास्क हे गटातील ज्या महिलांकडे शिलाई मशीन उपलब्ध आहेत, त्यांच्यापर्यंत पोचवले जातात व त्यानंतर संबंधित महिलांमार्फत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मास्क शिलाईचे काम पूर्ण करण्यात येते.
जागतिक महामारीच्या संकट काळात लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे; याच जाणिवेतून सामाजिक बांधिलकी जपत आपला खारीचा वाटा स्वागत हिरकणी महिला उद्योग गटाने दाखवून दिला आहे.
अर्चना देशमुख,
सहाय्यक संचालक,
विभागीय माहिती कार्यालय, नाशिक
