महाराष्ट्र

पायाभूत सुविधा क्षेत्रातील एमईआयएल कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीत दोन कोटी रुपये जमा

मुंबई, दि.६ : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य एकजुटीने मुकाबला करत आहे. यासाठी आवश्यक अशा निधीसाठी दानशूर व्यक्ती, संस्था आदी घटकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या अनुषंगाने आता मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचा ओघ सुरु झाला आहे. त्यामध्ये आज मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपनीने दोन कोटी रुपयांचे योगदान जमा केले.

एमईआयएल ही पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत कंपनी आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीव्ही कृष्णा रेड्डी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली आहे. आपल्या या योगदानाबाबत त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्राद्वारे अवगतही केले आहे. पत्रात त्यांनी कंपनी स्वयंस्फूर्तीने हे योगदान जमा करत असल्याचे नमूद करतानाच महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी व्यापक आणि दृढ असे प्रयत्न होत असल्याचाही उल्लेख केला आहे.

००००

Most Popular

To Top