महाराष्ट्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन


मुंबई, दि. 6 : दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकजसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तबलिगी बांधवांनी पोलिस, प्रशासन आणि आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेऊन या समाजाच्या धर्मगुरुंची काल बैठक घेतली.

      

यावेळी तबलिगी धर्मगुरूंनी आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समाजातील बांधवांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या खोट्या संदेशांकडे दुर्लक्ष करून माणुसकी आणि देशहित जपत जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले. मरकजमध्ये सहभागी झालेले राज्यातील तबलिगी बांधव स्वत:हून प्रशासनाकडे जाऊन संपर्क साधतील अशी ग्वाही या धर्मगुरूंनी यावेळी आरोग्यमंत्र्यांना दिली.

      

जातीय सलोखा राखण्यासाठी धर्मगुरुंसोबत बैठक घेण्याबाबत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार काल रात्री आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी त्यांच्या निवासस्थानी मुंबईतील तबलिगी समाजाच्या धर्मगुरूंची बैठक घेतली. यावेळी मुफ्ती शौकत, मौलाना असद कासमी, अनीस भाई, डॉ. आरीफ हमदानी आदी उपस्थित होते.

      

निजामुद्दीन येथे झालेल्या मरकजमध्ये भाग घेतलेल्या राज्यातील नागरिकांचा जिल्हास्तरावर शोध सुरू आहे. पुणे, पिंपरी चिंवड, अहमदनगर, हिंगोली येथील सात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या निकट सहवासातील पाचजणदेखील पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अशा ज्या व्यक्ती दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, त्यांनी स्वत:हून प्रशासनाला,आरोग्य विभागाला तपासणीसाठी सहकार्य करावे, असे यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

धर्मगुरुंनी बैठकीतूनच तबलिगी समाजबांधवांना सहकार्य करण्याबाबत आवाहन केले आहे. सोशल मीडियावर सध्या जातीय द्वेष पसरविणारे संदेश, चित्रफिती व्हायरल होत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून देशहिताला प्राधान्य देतानाच माणुसकी जपत समाजात जातीय सलोखा, बंधुभाव कायम राण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही धर्मगुरूंनी समाजबांधवांना केले आहे.

००००

अजय जाधव..६.४.२०२०

Most Popular

To Top