महाराष्ट्र

मंत्रिमंडळ बैठक : दि. ७ एप्रिल २०२०

शिवभोजन योजना आता तालुकास्तरावर पुढील 3 महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

अन्न व नागरी पुरवठा विभाग

मुंबई, दि. 7 : शिवभोजन योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

सध्या जिल्हा मुख्यालयी ही शिवभोजन केंद्रे चालविली जातात.  आता तालुकास्तरावर सुरु होतील. पुढील तीन महिन्यासाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर 5 रुपये इतका करण्यात आला आहे. 

शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात 50 रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या 5 रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी 30 रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल. ही भोजनालये सकाळी 11 ते दुपारी 3 या काळात सुरु राहतील.

या शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

—–०—–

सार्वजनिक आरोग्य विभाग

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता

कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले.  या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली.

• 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला.

• उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली.

• 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली. त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरविण्यात आले. तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत.

• गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.

• आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्यात आली.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

• वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गेल्या काही दिवसात विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळा, विविध परिषदांच्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायिक, सुश्रुषा सेवा, परावैद्यक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांच्या सेवा अधिग्रहीत करणे.

• कोरोन विषाणुच्या अनुषंगाने सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण इमारत / कक्ष निर्माण करण्याच्या मार्गदर्शक सूचना देणे.

• कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर निर्जंतुकीकरण करणे.

—–०—–

अन्न व नागरी पुरवठा विभाग

केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यांना 8 रुपये प्रती किलो गहू आणि 12 रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती देखील केली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख एपीएल शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होईल.  त्यासाठी सुमारे 250 कोटी खर्च येणार असून मे आणि जून या महिन्यासाठी हे धान्य दिले जाईल.

सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून मिळते त्या व्यतिरिक्त 1 लाख 54 हजार 220 मेट्रिक टन धान्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे.  नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान आधारभूत किंमतीच्या दराने धान्य देण्याबाबत केंद्राचे जे धोरण आहे त्याला अनुसरुनच सवलतीच्या दरात धान्य मिळावे अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे.

Most Popular

To Top