क्वारंटाईन सुविधा, कोरोना उपचार विशेष रुग्णालयाची केली पाहणी
मुंबई, दि.7 : मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे सात पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या भागात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तसेच क्वारंटाईन सुविधा याचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सायंकाळी धारावीला भेट दिली. त्यांनी या भागात केवळ कोरोना उपचारासाठी उपलब्ध केलेल्या साई हॉस्पिटलला भेट देऊन व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या. क्वारंटाईनच्या सुविधेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.
आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी धारावीमध्ये अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा असलेल्या राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सलाही भेट दिली. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणण्याकरिता अधिक कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी या विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांना दिले.
धारावी भागात 50 खाटांचे साई हॉस्पीटल केवळ कोरोना उपचारासाठी घोषित केले असून तेथे व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये 350 खाटांची अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची पाहणीही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. याभागात 3500 जणांना होम क्वारंटाईन सांगितले असून अनेक संस्था, दानशूर व्यक्तींकडून याभागात धान्य, गरजेच्या वस्तूंचे वाटप केले जात आहे.
धारावी पोलीस ठाण्यात आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली. संसर्गाचा धोका वाढू नये याकरिता गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच त्यासाठी कडक अमंलबजावणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. याभागात असलेल्या सार्वजनिक स्वचछतागृहांमध्ये सातत्याने निर्जंतुकरणाची प्रक्रिया राबवावी अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
अजय जाधव..७.४.२०२०