महाराष्ट्र

स्वॅब नमुना घेताना सुरक्षिततेसाठी स्पेशल बॉक्स

अमरावती, दि. 6 : कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर संशयितांचे स्वॅब नमुने घेताना सुरक्षितता राखली जावी, यासाठी स्पेशल बॉक्सची निर्मिती करण्यात आली असून, हा बॉक्स येथील कोविड रूग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज या रूग्णालयाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.

येथील विभागीय संदर्भ रूग्णालयात स्वतंत्र कोविड रूग्णालय स्थापित करण्यात आले आहे. त्यासाठी 100 डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट, लॅब असिस्टंट, सुरक्षारक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या रूग्णालयात सुरक्षिततेसाठी तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्यानुसार संशयित व्यक्तीचे स्वॅब नमुने घेताना संबंधित डॉक्टर, वैद्यकीय तंत्रज्ञ किंवा कर्मचारी यांची सुरक्षितता राखली जावी, यासाठी स्पेशल बॉक्सची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानिक तंत्रज्ञाच्या मदतीने हा बॉक्स विकसित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जंतुनाशक फवारणीसाठी अद्ययावत यंत्रेही मिळविण्यात आली आहेत. या यंत्रणेची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.



जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभी नव्याने स्थापित करण्यात आलेल्या कोविड 19 रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर तपासणी कक्ष उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी एका बॉक्समध्ये निर्जंतुकीकरणाची सुविधा आहे. त्यानंतर तंत्रज्ञांकडून संशयिताच्या थ्रोट स्वॅबचे नमुने बॉक्समध्ये बसून अंतर राखून सुरक्षितपणे घेण्यात येतील. या इमारतीत दुसऱ्या माळ्यावर विलगीकरण कक्ष व चौथ्या माळ्यावर आयसीयुची सुविधा आहे. या यंत्रणेचे प्रात्यक्षिकही यावेळी झाले. 



 येथील डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी उत्तम सेवा बजावत आहेत. त्यांनी रुग्णालयात दाखल नागरिकांना दिलासा द्यावा. त्यांचे मनोबल वाढवावे. त्याचबरोबरच स्वत:चीही काळजी घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपजिल्हाधिकारी अजय लहाने यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Most Popular

To Top