महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना

मुंबई, दि. 7 : कोरोनामुळे उद‌्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली.

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा सामायिक पध्दतीने घेण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला.

 

विद्यापीठांनी आपल्या आकस्मक निधीचा वापर कोरोना परीक्षण प्रयोगशाळा सुरु करणे, मास्क व सेनिटायझर निर्मिती तसेच इतर समाजोपयोगी साहित्य तयार करण्यासाठी करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

वर्च्युअल क्लास रुम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाईन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य सुरु ठेवावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.प्रत्येक विद्यापीठाने आपल्या परिसरामध्ये स्थलांतरित कामगार, बेघर व निराश्रीत लोकांना भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

विद्यापीठांच्या कुलगुरुंनी आपल्या वेतनाचा काही भाग शासनाला योगदान म्हणून देता येईल का याचा विचार करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

श्री. उदय सामंत :-

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा सामायिकपणे घेता येतील का याचा अभ्यास करुन शासनाला अहवाल सादर करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठांच्या कुलगुरुंची समिती गठीत केली असून समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी राज्यपालांना दिली.

विद्यापीठांमध्ये कोरोना टेस्टींग लॅब सुरु करण्याबाबत तसेच कमी किमतीचे व्हेटींलेटर निर्माण करण्याबाबत विद्यापीठांच्या प्रयत्नांना शासन सर्वतोपरी मदत करेल असे त्यांनी या बैठकीत सांगितले.

यावेळी कुलगुरूंनी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रशिक्षित स्वयंसेवक मदतकार्यात देत असलेले योगदान, तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी करीत असलेले प्रयत्न तसेच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.

Most Popular

To Top