महाराष्ट्र

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामधील ‘कोरोना प्रयोगशाळा’ नमुने तपासणीसाठी तयार

महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ होण्याचा बहुमान एकाचवेळी दोन तासात 384 नमुने तपासणी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रामध्ये ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ तयार झाली आहे. येणाऱ्या दोन दिवसामध्ये आवश्यक त्या मान्यता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) प्राप्त होणार आहेत. त्यानंतर कोरोना संसर्गजन्य द्रवाचे नमुने तपासणी सुरु करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये एकाचवेळी दोन तासात 384 नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची प्रयोगशाळा निर्मिती करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिले ठरणार आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या समन्वयाने ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या इंक्य्युबेशन केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली सुसज्य प्रयोगशाळा असल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्याशी चर्चा करून ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ सुरु करण्याकरिता केंद्र सरकारच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) सादर केला होता. पुढील दोन दिवसात याबाबतची मान्यता मिळणार आहे.

विद्यापीठाच्या इंक्य्युबेशन केंद्रासाठी यापूर्वीच रुसा कडून रु.5 कोटी एवढा निधी मिळाला होता. त्यामुळे अत्याधुनिक अशा उपकरणाची उपलब्धता आहे. याशिवाय प्रयोगशाळेसाठी अजून आवश्यक असलेले उपकरणे व सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु.52 लक्ष मंजूर केले आहेत. प्रयोगशाळेसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणा रियल टाईम पीसीआर उपलब्ध आहे. त्याद्वारे एकाचवेळी दोन तासात 384 कोरोना संसर्गाचे स्वॅबचे नमुने तपासता येतात. प्रयोगशाळेतील नमुने परीक्षणाचे काम इंक्य्युबेशन केंद्राचे समन्वयक डॉ.जी.बी.झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. इत्तरही लागणारे उपकरणे विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील वापरण्यात येणार आहेत. यासाठी लागणारे कुशल व अनुभवी मनुष्यबळ इंक्य्युबेशन केंद्रामध्ये काम करीत असलेल्या ‘स्टार्ट अप’मधील व्यक्तींची निवड केल्या जाणार आहे.  शिवाय बाहेरील प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येणार आहे.



कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या प्रयोगशाळेचा 100 मि अंतरापर्यंत कुणीही येणार नाही यासाठीची पूर्ण उपाययोजना करण्यात येणार आहे. इथे फक्त पूर्ण सुरक्षित कपड्यामध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिल्या जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे मराठवाडयातील आणि आजूबाजूच्या राज्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. कोरोना संशयितांच्या घशातील द्रवाची (स्वॅब) तपासणी लवकरात लवकर होईल. आणि कोरोणाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर तात्काळ औषोधोपचार करता येणार आहे.

या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, रुसा हर्बोमेडिसिन सेंटरचे समन्वयक डॉ.शैलेश वाढेर, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, डॉ.जी.बी.झोरे हे दिवसरात्र विशेष परिश्रम घेत आहेत. डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी लाभत आहे. कार्यकारी अभियंता अरुण पाटील, उपअभियंता अरुण धाकडे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी परिश्रम घेत आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्राकडून विद्यापीठाचे कौतुक

सोमवार, दि. 6 एप्रिल रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. यामध्ये कोरोना प्रयोगशाळा उभारणी केल्याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आणि कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांचे विशेष कौतुक केले. आणि इत्तरही विद्यापीठांनी याबाबतीत पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

Most Popular

To Top