महाराष्ट्र

भूतलावरील देवदूत….!


उत्तरप्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड या राज्यातील हातावर पोट असणारे जवळपास 2 हजार 500 स्थलांतरित मजूर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अलिबाग तालुक्यात राहत आहेत. या स्थलांतरित मजूरांची निवास आणि जेवणाची व्यवस्था करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी शासनाने आपली जबाबदारी म्हणून स्वीकारली आहे. 

अलिबाग तालुक्याचे तहसिलदार सचिन शेजाळ हे या स्थलांतरीत मजूरांची उपासमार होणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाने अत्यंत तडफेने काम करताना दिसून येत आहेत. जणू काही ते अलिबाग व आजूबाजूच्या परिसरातील समाजातील दानशूर व्यक्ती आणि स्थलांतरीत गरजू मजूर यांच्यातील देवदूतच बनले आहेत. या 2 हजार 500 मजूरांना डाळ, तांदूळ, पीठ, मीठ, हळद, तिखट, खाद्यतेल अशा जीवनावश्यक वस्तू शिधा पॅकिंगमध्ये देण्यात येत आहेत.  या संकटकाळात अलिबागमधील विविध समाजसेवी संस्था, व्यापारी आणि काही दानशूर व्यक्तीदेखील त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्या मदतीतून जमा झालेला जीवनावश्यक वस्तूंचा शिधा घाऊक स्वरुपात खरेदी करुन अलिबाग शहरातील गुजराथी महाजन सभागृहात आणण्यात येतो.

सद्यस्थितीत 1 हजार किलो डाळ, 5 हजार किलो पीठ, 5 हजार किलो तांदूळ, 1 हजार किलो मीठ, 1 हजार किलो हळद व तिखट आणि 1 हजार किलो खाद्यतेल घाऊक प्रमाणात माल आणले जाते व ते एक किलो वा दोन किलो असे पॅकिंग केले जाते.  हे पॅकिंगचे महत्त्वाचे काम उन्नती महिला बचतगटाच्या सुमारे 10 ते 12 महिला बचतगटाच्या प्रमुख पल्लवी जोशी यांच्या पुढाकाराने करीत आहेत. या कामाकरिता रवीकिरण काळे, ऋषीकेश भातखंडे, ओंकार मनोहर आदी सामाजिक कार्यकर्तेही अधिक मदत करीत असून हा पॅकिंग केलेला शिधा यांच्या मदतीने स्थलांतरित मजूरांना देण्यात येतो.

याबरोबरीनेच अलिबाग शहराचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने अलिबाग परिसरात ज्या स्थलांतरीत मजूरांना शिधा दिला तरी जेवण तयार करण्याची सुविधा नाही, अशांना शोधून त्यांना तयार जेवण देण्याची जबाबदारी गेल्या 10 ते 15 दिवसांपासून अखंडपणे पार पाडली जात आहे.  या मित्रमंडळाच्या सामाजिक जाणिवेतून दररोज 1 हजार 400 स्थलांतरित गरजू मजूरांना हे जेवण देण्यात येत आहे. यापैकी 1 हजार 200 गरजूंकरिता जेवण तयार करुन देण्यात येते तर उर्वरित 200 जणांना 200  शिवभोजन थाळ्यांचे जेवण  खरेदी करुन देण्यात येते.

याचप्रमाणे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी हे देखील सामाजिक बांधिलकी जपत दररोज 2 हजार मजूरांना तयार जेवण देत आहेत. नुकतेच थळ ग्रामपंचायत हद्दीतील गरजू गावकऱ्यांना,निराश्रित मजूरांना त्यांच्या पुढाकारातून पालकमंत्री कु. आदिती तटकरे, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे यांच्या हस्ते अन्नधान्य, जेवणाची पाकिटे व फळे वाटपही करण्यात आले.

विशेष म्हणजे सामाजिक कार्य करीत असताना कोणत्याही प्रकारे शासनाने दिलेल्या सूचनांचा, नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यात येत असून सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायजरचा वापर, स्वच्छता आदी गोष्टींची पुरेपूर काळजी घेण्यात येते.

कोरोना विषाणूमुळे संबंध जग संकटात असताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पनवेल महानगरपालिक आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी माणूसकी जपत या काळात निराश्रित, बेघर, हातावर पोट असणाऱ्या मात्र आता लॉकडाऊनमुळे काहीही काम मिळत नसलेल्या मजूरांना आश्रय देऊन त्यांच्या जेवणाची, आरोग्याची काळजी घेत आहेत, अशा प्रकारे  अहोरात्र काम करणारे हे सर्वचजण जणू काही भूतलावरील देवदूतच असल्याचाच अनुभव सर्वत्र येत आहे. 

या देवदूतांना त्रिवार वंदन !….

००००

– मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग

Most Popular

To Top