महाराष्ट्र

मी कोविड-१९ चाचणी केली, मी निगेटिव्ह आहे – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख

मुंबई, दि. 8 :  मला खोकला आणि नंतर ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  काल मुंबईतील जे. जे. रुग्णालयात कोरोना टेस्ट करून घेतली आहे. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे, असे  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

अमित देशमुख यांना खोकला आणि ताप आल्याने कोविड-19 चाचणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितल्याने ही चाचणी जे.जे. रुग्णालयातल्या  फिवर क्लिनिक येथे  वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनानुसार यांच्या सहकाऱ्यांमार्फत करण्यात आली.  आज रिपोर्ट  नेगेटिव्ह आला आहे. अमित देशमुख यांची प्रकृती ठीक आहे. काळजीचे कारण नाही. आणखी चार दिवस घरून काम पाहणार आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम पाहता येईल, असे श्री.देशमुख यांनी म्हटले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने कार्यरत असताना आपल्याला लागण  झाल्यास इतरांना प्रादुर्भाव होऊ नये, त्याचप्रमाणे कुटुंबियांनाही याचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने आपण ही चाचणी करून घेतली आहे, असे अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने ठिकठिकाणी फिवर ओपीडी सुरू केली आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून कोरोना तपासणीची सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत असतील त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन करोना तपासणी करून  घ्यावी. आजार लवकर लक्षात आल्यास लवकर उपचार करणे आणि लवकर बरे होणे शक्य असल्याने अधिकाधिक लोकांनी पुढे यावे, असे वैद्यकीय  शिक्षण मंत्री श्री.देशमुख यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून कोविड –19  संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.  कोविड –19  तपासणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. याचा विस्तार आणि व्याप्ती वाढविण्याचे काम सुरू आहे. आपल्यात लक्षणे दिसत असतील, तर कोविड-19 संदर्भातील हेल्पलाईनला संपर्क करा, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि चाचणी  करून घ्या, असे आवाहन माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री यांनी केले आहे. आपले आई-वडील, कुटुंब  आणि शेजारी  यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी आपणाला घ्यावयाची आहे.

कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभाग मदतीसाठी तत्परतेने आपल्या सेवेत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आजवर सर्वांनी चांगली साथ दिली आहे, ती यापुढेही ती मिळेल, असा विश्वास व्यक्त करून राज्यात शेवटचा रूग्ण असेपर्यंत कोरोना विरुद्धचा लढा सुरूच राहील, असेही श्री.देशमुख यांनी म्हटले आहे.

000

वर्षा आंधळे/वि.सं.अ./08/04/2020

Most Popular

To Top