महाराष्ट्र

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यासाठी पुढे यावे – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन


सातारा, दि. 8 : राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवून सहकार्य करावे, असे आवाहन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.

राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम म्हणून  जगाची अर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. देशातही सर्वत्र उत्पादकता थांबली आहे, उद्योग बंद आहेत, लहान व्यवसायांवर गंडांतर आले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध सहकारी संस्था, स्वयंसेवकांनी तसेच दानशूर व्यक्तींनी  मोठ्या प्रमाणात मदत केली आहे हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे.

पतसंस्था, बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, ऑईल मिल यांच्या माध्यमांतून महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात अर्थिक परिवर्तन घडले आहे. राज्यात 475 नागरी बँका, 13 हजार 559 नागरी पतसंस्था, सात हजार 253 कर्मचारी पतसंस्था, 21 हजार 425 विकास सोसायटी, 95 हजार 468 सहकारी गृहनिर्माण संस्था, 215 साखर कारखाने, 67 सहकारी दूध संघ आहेत. इतक्या संस्थांद्वारे सहकाराचे जाळे राज्यभर पसरले आहे. सहकार कायद्यातही संस्थेच्या नफ्याच्या किती टक्के रक्कम मदत करावी, याची तरतूद आहे.  तरी राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मोठ्या प्रमाणात मदत करुन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही सहकार व पणनमंत्री    श्री. पाटील यांनी केले आहे.

0000

Most Popular

To Top