महाराष्ट्र

सांगलीत ‘लॉकडाऊन’चे अचूक नियोजन; १४ रुग्ण कोरोना मुक्त


सांगली :संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असून प्रत्येक देश आपआपल्या पातळीवर या विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे आपल्या देशात आणि राज्यातही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी इस्लामपूर- सांगली ने एक नवा पॅटर्न निर्माण केला आहे. इस्लामपूर मध्ये असलेले कोरोनाचे चौदा रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले. ही बाब निश्चितच आनंददायी अशीच आहे. जनतेचे सहकार्य, शासनाचे कार्य आणि राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा या त्रिसूत्री ने कोरोनास प्रतिबंध  केला. हा पॅटर्न निश्चितच  अनुकरणीय असा आहे.

नागरिकांवर विश्वास

सांगली जिल्ह्यातील नागरिकांवर माझा मोठा विश्वास आहे. नागरिक लॉकडाऊनचे पालन अत्यंत चोखपणे करत आहेत. त्याबाबत मी जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानतो. लोकांची कोणतीच गैरसोय होणार नाही. त्यांना सर्व अत्यावश्यक सुविधा मिळतील याची काळजी शासन, प्रशासन घेत आहे, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आपल्या जनतेस दिले.केवळ आश्वासन  न देता ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी  मंत्री महोदय कार्यरत झाले.

लॉक डाऊन जाहीर होताच त्यांनी आपला मुक्काम सांगलीत  हलविला.  दिवसाचे सोळा सोळा तास सर्व तालुक्यात  फिरले.  या दौऱ्यात  कोणताही  शासकीय बडेजाव  न ठेवता  सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन,  आलेल्या संकटास धैर्याने सामोरे जाण्यासाठी  दिलासा दिला.

    

खानापूर, आटपाटी, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, मिरज ,सांगली, वाळवा, इस्लामपूर अशा सर्व तालुक्यांचा आढावा प्रत्यक्ष त्या त्या भागात भेटी देऊन घेतला. त्या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी, सर्व संबंधित अधिकारी यांना विश्वासात घेऊन सखोल चर्चेद्वारे स्थानिक अडचणींचा विचार करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी  नियोजन केले.

तात्काळ उपाययोजना

कोरोनाचे रुग्ण आढळल्यापासून तर जयंत पाटील यांच्या  दौऱ्यास  अधिक गती मिळाली . ज्या परिसरात रुग्ण आढळले त्या परिसरात ग्राऊंड झिरोवर जाऊन पाहणीदेखील केली.

इस्लामपुरात आढळून आलेल्या कोरोनाच्या २५ रुग्णांपैकी १४ रुग्ण आता कोरोनामुक्त झाले . इतर ११ रुग्णांच्या प्रकृतीतही आता सुधारणा होत आहे. त्यांच्या टेस्टही नेगेटिव्ह येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही सांगली जिल्ह्यासाठी फार समाधानकारक बाब आहे .

    

सांगलीतील परिस्थितीची भीषणता लक्षात घेताच तात्काळ गरज असलेल्या सर्व उपाययोजना केल्या. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास यश मिळाले. इस्लामपुरात कोरोनामुळे सुरुवातीला जे घडले ते आता वाढणार नाही .सांगलीत कोरोना आटोक्यात येत आहे मात्र इतर ठिकाणी आकडे वाढत आहे जी चिंतेची बाब आहे. म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने वागावे असा संदेश पालकमंत्र्यांनी  दिला आहे.

सर्वांगीण प्रयत्न

कोरोना मुकाबला करण्यासाठी  जिल्ह्यात  सर्वांगीण  सुविधा निर्माण व्हाव्यात,  यासाठी  विशेष प्रयत्न करण्यात आले. अत्यंत अल्प काळात मिरज येथे विशेष कोरोना रुग्णालय स्थापन केले गेले.  ज्यात जास्तीच्या व्हेंटिलेटरची सुविधा केली असून मॉनिटर, मास्क, पीपीईच्या सुविधा दिल्या आहेत. आवश्यकता भासल्यास प्रसंगी खासगी यंत्रणांची मदत घेतली जाईल मात्र नागरिकांना कोणती अडचण होऊ देणार नाही असे आश्वासन जनतेस देऊन पालकमंत्र्यांनी सर्वांना मोठा दिलासा दिला आहे.

जीवनावश्यक सुविधा

वैद्यकीय सुविधांसोबत  नागरिकांच्या  इतर महत्त्वाच्या अशा जीवनावश्यक  प्रश्नांकडे, त्यांच्या गरजांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे असते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्था पूर्ववत होत आहेत. खाजगी दवाखाने  सुरू झाले आहेत. पेट्रोल-डिझेलाचा प्रश्न, शेतीसाठी कॅनमधून डिझेलचा पुरवठा, स्वस्त धान्य पुरवठा ,भाजीपाल्याची योग्य प्रकारे खरेदी विक्री, द्राक्ष डाळिंब तसेच अन्य नाशवंत मालक अशा कृषिमालाची योग्य रितीने पाठवणी, पशुखाद्य पुरवठा, किराणा मालाचा  योग्य पुरवठा त्याबाबत  योग्य नियोजन होत आहे. रोजंदारीवरील मजुरांचे स्थलांतर त्याचप्रमाणे शिवभोजनचे नियोजन या बाबींकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले आहे.

     

कोरोना कोणतीही जात, धर्म पाहत नाही. सर्वांना नियम सारखेच आहेत. आपल्याला आपले राज्य, आपला जिल्हा वाचवायचा असेल तर सर्वांनीच नियमांचे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक  आहे असे  पालकमंत्री जयंत पाटील यांचे म्हणणे आहे . आणि ही बाब खरंच महत्त्वाची आहे. याचे पालन आपण सर्वांनीच करायला पाहिजे. तरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल.

     राजू पाटोदकर,

वरिष्ठ सहायक संचालक

मा व ज म, मंत्रालय, मुंबई

Most Popular

To Top