महाराष्ट्र

मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या भागात पूर्णपणे लॉकडाऊन

नागरिकांनी बाहेर न पडण्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे आवाहन

मुंबई दि. 9 :  कोरोना प्रादुर्भाव वाढलेल्या मुंबई शहरातील विविध अतिसंवेदनशील भाग  (कंटेंटमेंट झोन) संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार असून संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. या भागात कोणालाही फिरण्यावर पूर्णपणे निर्बंध लादले जातील. तसेच अशा क्षेत्रांमध्ये  निर्जंतुकीकरणाचा कार्यक्रम वेगाने आणि अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

संचारबंदीच्या काळात भाजी खरेदीचे कारण सांगून नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील रस्त्यावर  विनापरवाना  बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती  श्री. शेख यांनी दिली.

मुंबईतील कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयात  विशेष बैठक बोलावली होती. बैठकीला मुंबईचे पोलिस आयुक्त परम बीर सिंग, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना श्री. शेख म्हणाले, कंटेंटमेंट झोन असलेल्या भागात भाजीपाला विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोरात-कठोर कारवाई करण्यात येईल. या नियमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी यासाठी महानगरपालिका  आणि पोलिस यांच्यात समन्वय साधण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करण्यात येणार आहे.

कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घरात सुरक्षितपणे थांबावे. भाजीपाला, किराणा आणण्याच्या सबबीखाली बाहेर पडू नये. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबईकरांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. शेख यांनी केले आहे.

Most Popular

To Top