महाराष्ट्र

केंद्रीय पथकाकडून पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा


विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती

पुणे, दि.११ : राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दोन दिवसीय दौरा पार पडला. दरम्यान विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकाची बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक तथा केंद्रीय पथकाचे अध्यक्ष डॉ.पी.के.सेन, राम मनोहर लोहिया (आर.एम.एल.) रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ञ तथा पथकाचे सदस्य डॉ.रोहित बन्सल, सफदरजंग रुग्णालयाचे भूलतज्ज्ञ तथा सदस्य डॉ.सौरभ मित्र मुस्तफी, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख,सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप औटी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर,आदी उपस्थित होते.

पुणे विभागात जिल्हानिहाय अद्यापपर्यंतचे कोरोना संशयित रुग्ण, बाधित रुग्णांची पार्श्वभूमी डॉ. म्हैसेकर यांनी विशद केली. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आलेली तयारीबाबत माहिती देऊन आवश्यक असणारे पीपीई किट, औषध साठा आदी विषयांबाबत चर्चा केली.

प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने सुरु असणाऱ्या उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले. दरम्यान या समितीने बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय (ससून रुग्णालय), नायडू रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध, यशवंतराव चव्हाण रुग्णालय व टेस्टिंग लॅब या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. तसेच आरोग्य विभाग पुणे व पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करुन जिल्ह्याची कोरोना विषयक सद्यस्थिती जाणून घेतली.

Most Popular

To Top