महाराष्ट्र

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके कार्यरत

साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचे आदेश

मुंबई, दि. १२ : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार व अतिरिक्त भाववाढ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. राज्याच्या वैधमापन शास्र विभागाने जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी व भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके तयार केली आहेत. ही पथके किरकोळ तसेच घाऊक व्यापार प्रतिष्ठाने, गोदामे, शीतगृहे इत्यादी ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता व दरांची पडताळणी करून कारवाई करणार आहेत.

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होऊ शकते. याबाबत पुरवठा विभागासोबतच महसूल विभाग आणि वैधमापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणारे व चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ सबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून किमती वाढविल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसून किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे, असे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. 

राज्यात लक्ष निर्धारित सार्वजनिक व्यवस्थेमार्फत अंत्योदय योजना तसेच प्राधान्य लाभार्थी कुटुंब धारकांना नियमित धान्यासोबतच मोफत तांदळाचे वितरण सुरु आहे. मे आणि जूनमध्ये राज्यातील सुमारे ३ कोटी ८ लाख केशरी कार्डधारकांना गहू व तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामामध्ये पुरवठा विभागाची यंत्रणा व्यस्त आहे. अशा वेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत स्वस्त धान्य दुकानांमधून पुरवठा केला जाणाऱ्या अन्नधान्याच्या कामामध्ये सहाय्य करावे. स्वस्त धान्य दुकान बंद असणे, जास्त दराने धान्य देणे, देय असलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात धान्य वितरित करणे अशा प्रकारच्या तक्रारींवर वेळीच कारवाई होण्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मदत करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Most Popular

To Top