महाराष्ट्र

राज्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. 12 – कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये  कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या व अद्यापपर्यंत कोविड-19 प्रयोगशाळा नसणाऱ्या  कोल्हापूर, जळगाव, बारामती, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, लातूर, नांदेड व अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सर्व खाजगी आणि अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अशा तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी यांना दिल्या होत्या,त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी याबाबतचे प्रस्ताव आजच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, नवी दिल्ली यांच्याकडे पाठवावेत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी  पत्राद्वारे  सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत.

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरु करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला असून हे प्रस्ताव केंद्र शासनाकडून तातडीने मान्य करून घेण्यात येतील, असेही  वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

Most Popular

To Top