महाराष्ट्र

घरच्या घरीच समतेचा दिवा लावून संविधान रक्षणाचा संदेश द्यावा – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा

 

 

मुंबई, दि.13 : 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे कोणतेही सामूहिक आयोजन न करता सर्वांनी घरच्या घरीच साजरी करावी, तसेच संविधान व समतेचा दिवा लाऊन संविधान रक्षणाचा व देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक असल्याचा संदेश सर्वांनी जगाला द्यावा, असे आवाहन श्री. मुंडे यांनी केले आहे.

महाराष्ट्रासह जगासमोर उभ्या असलेल्या कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे राज्यात सर्वत्र टाळेबंदी लागू आहे, अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या संविधानाचा व राज्यघटनेतील नागरिक म्हणून आपल्याला घालून दिलेल्या कर्तव्यांचा सर्वांनी अंमल करून सरकारला सहकार्य करावे, असे मंत्री श्री. मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, सर्वांनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून पुष्पहार अर्पण करावा, घरी गोडधोड करून कुटुंबियांना शुभेच्छा द्याव्यात तसेच संध्याकाळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर, अंगणात/गॅलरीत संविधानाचा व समतेचा दिवा लावावा व यातून भारताचे कर्तव्यदक्ष नागरिक असल्याचा संदेश जगाला द्यावा असेही मंत्री श्री. मुंडे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर – चित्रपटाचा लाभ घ्यावा

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभाग, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने सामाजिक न्याय विभाग भारत सरकार निर्मित डॉ. बाबासाहेब आंबेडकर – द अनटोल्ड ट्रुथ हा चित्रपट मंगळवारी (14 एप्रिल) दुपारी 1.30 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा सर्वांनी आनंद घ्यावा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र प्रत्यक्ष अनुभवावे असे आवाहन मंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

भीमजयंती निमित्त योगदान द्यावे

दरम्यान, या महामारीच्या कठीण काळात राज्य सरकार समाजातील गोरगरीब, वंचित उपेक्षित प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहचून जीवनावश्यक वस्तू व आरोग्यविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या परिस्थितीत समाजातील दानशूर सक्षम लोकांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी पुढे येऊन मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करावी अशी विनंतीही श्री. मुंडेंनी आपल्या शुभेच्छा संदेशद्वारे केली आहे.

 

 

0000

श्री. दत्तात्रय कोकरे, वि.सं.अ.

Most Popular

To Top