27 एप्रिल : 49 वर्षीय भय्यूजी महाराज 30 एप्रिलला पुन्हा बोहल्यावर चढतायत. आई आणि बहिणीच्या आग्रहाखातर महाराज पुन्हा लग्नाला तयार झालेत. मध्य प्रदेशमधल्या डॉ. आयुषी शर्मा यांच्याशी त्यांचा इंदूर इथं विवाह होतोय.
सध्या राजकीय वर्तुळात वजनदार व्यक्तिमत्व मानलं जाणारं आणि स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराजांचा यांचं नाव डॉ. उदयसिंह देशमुख…29 एप्रिल 1968 ला इंदूरच्या सृजलपुरात त्यांचा जन्म झाला. रुबाबदार आणि देखणं रुप लाभलेल्या डॉ. उदयसिंह यांनी 20 वर्षी सियारामसाठी मॉडलिंग केलं. पण त्यानंतर त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश केला.
1996 ला त्यांनी सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना केली. गोरगरीब, गरजुंचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाकडून समाजसेवेसाठीच त्यांना डॉक्टरेट देण्यात आली आहे. पण त्यांची खरी ओळख ती राजकीय गुरू म्हणूनच…विलासराव देशमुखांसोबतच ते अनेक राजकारण्यांचे गुरू आहेत. सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध असून ते नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीलाही उपस्थित होते.
कोण आहेत भय्यूजी महाराज?
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू (राजकीय गुरू)
अनुयायांकडून ‘राष्ट्रसंत’ उपाधी
नाव : डॉ. उदयसिंह देशमुख
जन्म : 29 एप्रिल 1968
जन्मगाव : सृजलपूर, इंदूर
20 व्या वर्षी मॉडेलिंग
दृष्टांत झाल्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश
1996 मध्ये सूर्योदय परिवार आणि आश्रमाची स्थापना
वेगवेगळ्या संस्थांच्या स्थापनेत वाटा
अनेमिक रुग्णांसाठी विशेष काम
भारतभरात 11,11,111 झाडं लावण्याचा संकल्प
विलासराव देशमुख आणि अनेक नेत्यांचे गुरू
2 वर्षांपूर्वी पत्नीचं हृदयविकाराने निधन
अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जातात. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करतात. मराठा आक्षणसाठीच्या मोर्चामागे भय्यूजी महाराज असल्याच्याही चर्चा होत्या.
2 वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबातून लग्नाचा आग्रह होता. त्यांनी तो आग्रह आता मान्य केला आहे. पहिल्या पत्नीपासून त्यांना कुहू ही 13 वर्षांची मुलगी आहे. आता मध्यप्रदेशातल्या 30 वर्षीय डॉ. आयुषी शर्माशी विवाहबद्ध होतायत. त्यासाठी त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.