पंकजा मुंडेंशी खास बातचीत:त्यांना माझी भीती का वाटते? पक्ष साेडणार नाही आणि मला कुणी संपवूही शकणार नाही
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डाॅ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यापासून मुंडे परिवार नाराज असल्याची चर्चा आहे. बीड जिल्ह्यातील मंुडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देऊन आपली खदखद दाखवून दिली, तर पंकजा मंुडे यांनी मुंबईत समर्थकांचा मेळावा घेत सूचक विधाने केली हाेती. पाठाेपाठ साेमवारी भाजप आेबीसी माेर्चाच्या मुंबईत झालेल्या बैठकीसही पंकजा अनुपस्थित असल्याने त्याची अधिकच चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ला दिलेली विशेष मुलाखत…
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलेत, मात्र या विषयाची रणनीती ठरली त्या ओबीसी मोर्चाच्या मीटिंगला तुम्हाला बोलावले गेले नाही. याचे कारण काय असावे?
– पंकजा : कदाचित आमच्यावर रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी असते म्हणूनच असे झाले असावे. आम्हाला त्या मीटिंगची कल्पना नव्हती. मात्र, पक्षाच्या सगळ्या सेलच्या स्वतंत्र बैठका असतात, त्यात सगळ्यांना बोलावले जात नाही, हेही आहेच.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही सक्रिय असताना या विषयाच्या मीटिंगला न बोलावण्याचे कारण काय?
– पंकजा : ते मी कसं सांगू शकणार? मोर्चाच्या अध्यक्षांनाच विचारा. आंदोलन तेव्हाच यशस्वी होते जेव्हा लोक बोलणाऱ्या नेत्याचे ऐकतात. २६ तारखेच्या चक्का जाम आंदोलनासाठी पक्षाने मला जबाबदारी दिली, मी रस्त्यावर उतरले, निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली, सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. यापुढेही आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलने यशस्वी करू शकतो हे पक्षाला माहीत असल्याने नसेल बोलावले.
भागवत कराड यांच्या माध्यमातून समाजातील प्लॅन बी, धसांच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या नेतृत्वाचा प्लॅन बी पक्षात तयार केला जातोय अशी चर्चा आहे…
– पंकजा : मी नसेन तेव्हा प्लॅन बी लागेल. आत्ता मी आहे ना. त्यामुळे कुणी प्लॅन बी करत असेल असे वाटत नाही. नेतृत्वाचे तुकडे झाल्यास पक्षाचीच ताकद कमी होईल.
खडसेंना पक्ष सोडावा लागला. तुमचा संघर्ष संपत नाहीये… ओबीसी नेत्यांवर अन्याय होतोय?
– पंकजा : अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला ते सर्व नेते ओबीसी समाजातील आहेत. मी पक्ष सोडण्याचा विषय कुणी आणला याचा शोध घ्या. मी असे कधीच म्हणाले नाही. माझ्या बुद्धीला ते पटत नाही. ऑफर तर सगळ्या पक्षांकडून होत्या. मंत्रिपदाची ऑफर होती तेव्हा. पण मुंडे साहेबांनी जो पक्ष वाढवला, मला ज्या पक्षाने वाढवलं तो मी सोडून का जाऊ? माझी अवस्था खडसेंसारखी होऊ देणार नाही. अविरत संघर्ष करत राहीन.
‘वरळी छोडो-परळी जोडो’ असे बीडमध्ये अभियान सुरू झाले आहे… परळीमधील तुमचा जनाधार कमी झाला आहे…
– पंकजा : अजिबात नाही. हा विरोधकांचा प्रचार आहे. मला २०१४ मध्ये ९६ हजार मते होती ती २०१९ मध्ये ९२ हजार झाली. ८० हजार मते मिळालेले कसे निवडून आले ते सगळ्यांनी पाहिले. धनंजय पुण्यात राहतो, त्याची पत्नी पुण्यात आहे. मुंडेसाहेबांचा एक पाय वरळीत आणि दुसरा परळीत असे होते. बाकी मी सर्व मुंडेसाहेबांसारखे करायचे, मग ही टीका का? त्यात तथ्य नाही.
प्रीतम मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपद हवे होते, म्हणून तुम्ही राज्य मंत्रीपद नाकारले असे बोलले जाते…
– पंकजा : आम्ही कोणतेही पद मागायला गेलो नाही, जाणार नाही. मला फॉर्म भरण्यास सांगण्यात आला म्हणून मी भरला. कराडांना मी राखी बांधते. नंतरचा सर्व भाग टाळता आला असता. ‘पंकजा मुंडे नाराज’ या प्रश्नाला उत्तर देऊन मी थकले आहे. मी नाराज नाही. कार्यकर्ते नाराज होते. आता त्यांचाही राग मी शांत केला आहे. मी संघर्ष करणारी कार्यकर्ती आहे आणि करत राहणार. पुरोगामी परंपरा सांगणारा महाराष्ट्र जातीयवादी होत चालला आहे, याची खंत वाटते. मुंडेसाहेबांनी असे जातीपातीचे राजकारण केले नाही. ते बहुजनांचे नेते होते. शेतकऱ्यांचे नेते होते. कर्जमाफी मिळावी म्हणून १९८६ साली त्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. माझ्यापुढे त्यांचा आदर्श आहे. वंचितांच्या हितासाठी प्रस्थापितांविरोधात लढणारी मी आहे. म्हणून ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, मराठा आरक्षण टिकले पाहिजे यासाठी मी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, करत राहीन. मंत्रिपद होते तेव्हाही मी पंकजा मुंडे होते आणि पद नाही तेव्हाही मी पंकजा मुंडेच आहे. पदाच्या असण्या-नसण्याने मला काही फरक पडत नाही.
फडणवीसांना तुम्ही नेता मानत नाही का?
२०१४ पूर्वी एकत्र काम केल्याने आम्ही सहकारी आहोत. मुख्यमंत्री म्हणून ते माझे बॉस होते. विधिमंडळाच्या कामकाजात मी त्यांना मानते. पण, राजकीय पटलावर माझे नेते राष्ट्रीय स्तरावरील आहेत. कारण मी राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्या टीममध्ये काम करते. मध्य प्रदेशची सहप्रभारी म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मला सुनावण्यात आले वगैरे वावड्या आहेत. कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने माझ्यावर टीका केलेली नाही. केंद्रीय मंत्रिपदाचा विषय राष्ट्रीय नेतृत्वाने घेतला. त्यासंदर्भाने ते माझे नेते आहेत व त्यांचा निर्णय मला मान्य आहे, असे मी म्हणाले हाेते.
पंकजा उवाच… बाई म्हणून अधिक संघर्ष…
पाच वर्षांपूर्वी मी बाई आहे असा वेगळा विचार करत नव्हते. माझ्या कर्तृत्वाने मी समान पातळीवर आले. आईवडिलांनी आणि समाजानेही आम्हाला तसेच वाढवले. जेथे वाढले त्या समाजाने तो आत्मविश्वास दिला. एका आमदारांनी मला हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलावले तेव्हा मुंडे साहेब म्हणाले हाेते की ती चांगली वक्ता असल्याने तिला केवळ हळदी-कुंकवाएेवजी मेळाव्यात बोलायलाच बाेलव. फक्त महिला आघाडीच्या नकाे. एकदा मुंडे साहेबांसोबत कार्यक्रमाला जायचे म्हणून मी साडी नेसले तर माझी अस्वस्थता हेरून ते म्हणाले, तुला ज्यात कन्फर्टेबल वाटते ते कपडे घाल. त्यामुळे मी पण कधीच ‘बाई’ म्हणून स्वत:चा विचार केला नव्हता. पण आता जाणवतेय की, पुरुषप्रधानतेचा माइंडसेट असतोच. तो सगळीकडेच दिसताे. बॉलीवूडमध्येही नायिकेला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सोलो सिनेमे करावे लागतात. अनुभवातून माझेही असेच मत बनले आहे. बाई आहे म्हणून तुमच्यावर खालच्या पातळीवर टीका होते. मेरिट सिद्ध करूनही संघर्ष संपत नाही. हल्ली राजकारणाचा पोत बदलतो आहे.