सोनिया गांधींबद्दल जो होरा शरद पवारांचा होता, तसाच, त्याही पूर्वी, प्रणव मुखर्जींचा राजीव गांधींबद्दल होता. इंदिरा गांधींचे अगदी निष्ठावंत असणारे प्रणबदा राजीव गांधींच्या विरोधात गेले. कारण, राजीव यांना पंतप्रधानपद झेपणार नाही आणि राजीव गांधी ‘चालणार’ नाहीत, असा त्यांचा कयास होता. त्यात ते एवढे फसत गेले की, ‘मास अपील’ वगैरे नसतानाही स्वतःचा स्वतंत्र पक्ष काढून बसले!
इंदिरा गांधी गेल्यानंतर, म्हणजे १९८४ ते २००४ असा प्रणबदांचा वनवासच सुरू होता. नरसिंहरावांच्या कृपेनं नियोजन आयोगाचं उपाध्यक्षपद आणि वर्षभराचं मंत्रिपद वगळता दरम्यानच्या काळात त्यांच्या वाट्याला फार काही आलं नाही. त्या काळात मी त्यांना एकदा भेटलो होतो. तेव्हा, त्यांची निराशा लपून राहाणारी नव्हती!
आपल्या नव-याच्या विरोधात हा माणूस होता, हे माहीत असूनही सोनियांनी प्रणबदांचं मोल जाणलं. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि मुत्सद्देगिरीला ओळखलं. त्यामुळे २००४ ला कॉंग्रेस सत्तेत आल्यावर प्रणबदा ‘संकटमोचक’ वगैरे झाले. तोवर, शरद पवारांनीही सोनियांशी जुळवून घेतलं होतं. ज्या राजीव गांधींनी पवारांना कॉंग्रेसमध्ये सन्मानानं प्रवेश दिला, ते राजीव गेल्यानंतर, पुढे सोनियांच्या विरोधात पवार उभे राहिले. बरेच काही घडले. पण, ‘भले-बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर’ च्या चालीवर सोनियांनी त्यांना माफ केले.
विजनवासातल्या प्रणबदांचं प्राक्तनही सोनियांमुळंच पालटलं. अर्थात, एवढ्यानं काही त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना त्वरेने पंतप्रधानपदाचे वेध लागले. प्रणबदांच्या क्षमतांविषयी मुद्दाच नव्हता, पण डॉ. मनमोहनसिंगांशी त्यांची तुलनाही होऊ शकत नव्हती. तरी, प्रणबदांचे प्रयत्न सुरूच होते. शरद पवारही त्यांना मिळालेले होते. यूपीएमधील काही घटक पक्षांसह, चक्क बाळासाहेब ठाकरे वगैरेही प्रणबदांच्या जोडीला होते. सोनियांच्या आणि मनमोहनसिंगांच्या विरोधात प्रणबदांनी कंबर कसली. मात्र, २००९ मध्ये डॉ. मनमोहनसिंगच पुन्हा पंतप्रधान झाले.
नंतर प्रणबदा राष्ट्रपती झाले. सोनियांनीच त्यांना ही ऐतिहासिक संधी दिली. मोदी आल्यानंतर मोदींशी त्यांचे सूर जुळले. पुढे ते संघाच्या व्यासपीठावरही गेले. तिथे त्यांनी संघाला सुनावले. डॉ. हेडगेवार हे भारताचे थोर सुपुत्र असल्याचे प्रणबदांनी जाहीर केले. आणि, पुढे ते ‘भारतरत्न’ही ठरले.
खरोखरच मोठा माणूस!
आज त्यांची पुण्यतिथी.
- संजय आवटे