तुमच्या घराचा पत्ता लांबलचक सांगण्यापेक्षा काही अंकात सांगता आला तर? सगळं कसं स्वप्नवत वाटतं ना? थांबा, आता खरंच तुमच्या पत्त्याची जागा काही डिजिटल अंक घेणार आहेत. या अंकातून तुम्ही कोणत्या शहरात, एरिया, कोणता रस्ता, घर क्रमांक काय? आदी माहिती लगेच उपलब्ध होणार आहे. यासाठी मोदी सरकार मॅप माय इंडिया कंपनी दूरसंचार मंत्रालयासोबत मिळून एक पायलट प्रोजेक्ट तयार करत आहे. याला पोस्ट विभागाच्या माध्यमातून राबविले जाणार आहे.
कसा असेल डिजिटल पत्ता?
सरकारच्या या नवीन योजनेअंतर्गत तुमच्या पत्त्याच्या जागी सहा आकडी क्रमांक दिला जाणार आहे. या कोडचे नाव ईलॉक असे असेल. याचा फायदा हा असेल की कुणालाही हा क्रमांक सांगितला तर ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या घराच्या मॅपसह सगळी माहिती क्षणात उपलब्ध होईल.
काय फायदा होणार?
एखाद्या जागेच्या पत्त्याचा ईलॉक माहिती करुन घेतल्यावर तुमच्या समोर त्या जागी जायचे कसे याची माहिती मॅपसह सादर होईल. तसेच शहर आणि गावांनाही ईलॉक दिले जाणार आहेत. त्यामुळे एखाद्या गावात जाणे सोपे होईल. कारण त्या गावाचा रस्ताच तुम्हाला मॅपच्या माध्यमातून दिसेल.
सरकारचा प्लॅन काय?
एकदा का हा पायलॉट प्रोजेक्ट यशस्वी झाला कि, ईलॉकला तुमची सगळी माहिती लिंक केली जाणार आहे. जसे कि, तुम्ही विजेचे बिल किती भरता, तुमचे पाण्याचे बिल किती आहे, तुम्ही इन्कम टॅक्स किती भरता, तुमच्याकडे कोणकोणती प्रॉपर्टी आहे आदी माहिती सहज उपलब्ध होईल.
काळा पैसे दूर होणार!
ईलॉक सादर केल्यावर एखाद्या व्यक्तीकडे किती प्रॉपर्टी आहे, त्याचा फ्लोअर एरिया किती आदी माहिती सरकारकडे सहज उपलब्ध होईल. कोणत्याही माहितीची शहानिशा करणे सरकारला अवघड जाणार नाही. त्यामुळे काळ्या पैशांवर अंकूश लावणे सरकारला सहज शक्य होणार आहे.