दोषींवर 302 चे गुन्हे दाखल करण्याची मागणी
औरंगाबाद दि 29 – न्यायासाठी लढणा-या धर्मा पाटील यांचा मृत्यू नसून गेंड्याच्या कातडीच्या सरकारने केलेली ही हत्याच आहे. हा सरकारच्या क्रुरतेचा बळी असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतांनाच
हा धर्मावर भ्रष्ट्र सरकररूपी अधर्माचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धर्मा पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. न्यायासाठी मंत्रालयात येऊन जीवनातील शेवटचा संघर्ष त्यांनी केला तरी सरकारला त्यांना न्याय द्यावा वाटला नाही. या मृत्यूस केवळ आणि केवळ सरकारच जबाबदार आहे. सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट्र हेतूने चुकीची परिगणणा केली आणि जिल्हा स्तर ते मंत्रालय धर्मा पाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्या कडे न्याय मागितला आणि त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करा, या प्रकरणात दोषी असलेल्या तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पासून ते जिल्हाधिकारी या सर्वांना निलंबित करून कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मंत्रालयात येऊन जीव दिल्यानंतर ही इथे न्याय मिळत नाही आणि म्हणे आपले सरकार. मर्जीतल्या कंपन्यांची खिसे भरण्यासाठी आणि पतंजली ची उत्पादने विकण्यासाठी सुरु केलेली ही ‘आपले सरकार’ सारखी पोर्टलची नाटके बंद करून टाका . जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश आता दिले, मग दोन वर्ष काय केले? असा सवाल धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे. या सरकारच्या कार्यकाळात समृद्धी पासून ते सर्वच प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी , त्यांचा मोबदला एक मोठे भ्रष्ट्राचाराचे कांड असून यावर आपण आगामी अधिवेशनात आवाज उठवू असेही मुंडे म्हणाले. औरंगाबाद येथे पक्षाच्या बैठकीसाठी आले असतांना ते बोलत होते.