राष्ट्रवादी युवक काँग्रेसने औरंगाबाद महापालिकेवर फेकला कचरा, कचराकोंडीचा केला निषेध.
औरंगाबाद :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज औरंगाबाद महापालिकेवर कचरा फेकण्यात आला. गेल्या 9 दिवसांपासून औरंगाबाद शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते पालकमंत्र्यपर्यंत सर्वांनी प्रयत्न करून सुद्धा कचराकोंडी काही सुटायला तयार नाही त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज महापालिकेसमोर आंदोलन करत कचरा फेकला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता भांगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकला. कार्यकर्त्यांनी आज शहरात साचलेला कचरा दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रिक्षाने महापालिका गेटवर आणला तो सगळा कचरा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर फेकण्यात आला. त्यामळे एरवी चकाचक असलेल्या महापालिकेच्या गेटवर कचराच कचरा झाला होता. महापौर, आयुक्त आणि इतर पदाधिकारी यांनी गेल्या नऊ दिवसांपासून प्रयत्न करून सुद्धा कचरा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. परिणामी औरंगाबाद शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महापालिकेवर कचरा फेकला. यावेळीं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाअध्यक्ष दत्ता भांगे यांनी सांगितले की येत्या 2 दिवसात कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर महापौर व आयुक्तांच्या बंगल्यावर कचरा फेकू असा इशारा दिला आहे.
यावेळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण कार्याध्यक्ष रहीम पटेल, सुनील चव्हाण, अमोल साळवे, अफरोज पटेल, कैलास कुंटे पाटील, अक्षय डक, धनंजय जाधव, आनंद मगरे, अनिल बोरकर, आकाश गवई, शाहरुख बागवान आदी उपस्थित होते.