नवी दिल्ली – सर्व राजकीय पक्षांचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत असून आता या निवडणुकीत पक्षांतर्गतही बंडखोरीचे वारे वाहताना दिसत आहेत. एका कार्यक्रमात भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी केलेल्या भाषणात केंद्र सरकारलाच अडचणीत आणणारे मुद्दे उपस्थित करून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून घेतल्याचे वृत्त आहे.
देशात साडेसात हजार शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांत कर्जामुळे आत्महत्या केली आणि दुसरीकडे मात्र विजय माल्ल्याने ९ हजार कोटी रूपये घेऊन देशातून पळ काढल्याचे त्यांनी एका शाळेत झालेल्या कार्यक्रमात म्हटले. तसेच रोहित वेमुलाची सुसाइड नोट वाचल्यानंतर आपल्यालाही रडू कोसळल्याचे त्यांनी म्हटले. याच मुद्द्यांवरून केंद्र सरकार अडचणीत आले होते. यापूर्वीही खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.
आपल्या भाषणात हे मुद्दे उपस्थित करून वरूण गांधी यांनी या प्रकरणाला पुन्हा एकदा चर्चेत आणले. भाजपला नको असलेले मुद्दे पुन्हा उपस्थित केल्याने पक्षातील इतर नेते नाराज असल्याचे सांगण्यात येते. विजय माल्ल्या हे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून देशातून फरार असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर देशात अनेक खटले सुरू आहेत. याप्रकरणी माल्ल्यांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. मल्ल्यांचे राज्यसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. पण आपल्या ट्विटच्या माध्यमातून ते सातत्याने आपण पळून गेले नसल्याचा दावा करतात.
रोहित वेमुला हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील संशोधन करत होता. विद्यापीठ प्रशासनाने त्याच्यावर अनेक निर्बंध लावल्यामुळे त्याने कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येतो. त्याच्या आत्महत्येनंतर मोठा वाद झाला होता. यात केंद्र सरकारच्या भूमिकेवरही सवाल निर्माण करण्यात आला होता.
