मुस्लिम धर्म जगभरात NO.1
एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगात मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल, असा अंदाज अमेरिकन थिंक टँक प्यू रिचर्स सेंटरने व्यक्त केला आहे. सध्याच्या घडीला जगभरात ख्रिश्चन धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. २०१० पर्यंत जगभरातील मुस्लिमांची संख्या १.६ अब्ज इतकी होती. हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या २३ टक्के इतके होते. सध्या मुस्लिम धर्मीयांची संख्या ख्रिश्चन धर्मीयांपेक्षा कमी आहे. मात्र लोकसंख्येचा विचार केल्यास मुस्लिम धर्म जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे.
मुस्लिम धर्मीयांच्या वाढीचा सध्याचा वेग कायम राहिल्यास २१ व्या शतकाच्या अखेरीस मुस्लीम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल. सध्या सुरू असलेले शतक संपेपर्यंत मुस्लीम धर्माने अनुयायांच्या संख्येच्या बाबतीत ख्रिश्चन धर्माला मागे टाकलेले असेल, असा अंदाज प्यू रिसर्च सेंटरने वर्तवला आहे. सध्याच्या घडीला इंडोनेशिया या देशातील मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र ‘२०५० च्या अखेरपर्यंत मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पहिला असेल. २०५० वर्ष संपताना भारतात तब्बल ३० कोटी मुस्लिम असतील. सध्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र येत्या ३४ वर्षांमध्ये भारत इंडोनेशियाला मागे टाकेल,’ असे प्यू रिसर्च सेंटरने म्हटले आहे.
‘२०५० सालाच्या अखेरपर्यंत युरोपातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत १० टक्के वाढ झालेली असेल. तर अमेरिकेतील मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण २०५० च्या अखेरीस एकूण लोकसंख्येच्या २.१ टक्के असेल. सध्याच्या घडीला अमेरिकेतील मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण एक टक्का इतके आहे. मुस्लिम देशांमधून इतरत्र जाणाऱ्या मुस्लिमांचे प्रमाण वाढल्याने जगभरातील देशांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण वाढेल,’ असे प्यू रिसर्च सेंटरने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.
मुस्लिम धर्मीयांची संख्या वाढण्यामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे प्यू रिसर्च सेंटरने अहवालात नमूद केले आहे. सर्वाधिक जन्मदर हे मुस्लिम धर्माच्या वाढीचे पहिले कारण आहे. मुस्लिम धर्मीयांचा जन्मदर इतरांच्या तुलनेत जास्त आहे. जागतिक स्तरावरील सरासरी लक्षात घेता प्रत्येक मुस्लिम महिलेला साधारणत: ३.१ मुले असतात. इतर धर्मीतील महिलांचा विचार केल्यास ही सरासरी २.३ इतकी आहे. तरुणांची सर्वाधिक असलेली संख्या मुस्लिमांचे प्रमाण वाढण्याचे दुसरे कारण आहे. २०१० मध्ये मुस्लिम लोकसंख्येचे सरासरी वयोमान २३ वर्ष इतके होते. त्याच वर्षी बिगर मुस्लिम लोकसंख्येचे सरासरी वयोमान ३० वर्ष होते. तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने मुस्लिमांची संख्या येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
