महाराष्ट्र

भाजपला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही- जयंत पाटील

मुंबई – आगामी निवडणुकीमध्ये भाजपला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ ही नवी मोहीम फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून सुरू केली आहे. या अंतर्गत #जवाबदो वापरून फेसबुक आणि ट्विटरवदेखील राज्यातील लोक आपले प्रश्न थेट विचारू शकतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले . जनतेने विचारलेल्या या प्रश्नांना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे उत्तरे नाहीत, त्यामुळे आगामी काळात जनता यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, राज्यभरातून या फेसबुक संवादाला उत्तम प्रतिसाद लाभला आहे, असंही त्यांनी बोलताना सांगीतलं. दरम्यान, २०१९ मध्ये जसे रूपयाचा भाव शंभरी गाठेल, पेट्रोलचे दर शंभरी गाठतील त्याप्रमाणेच भाजपच्या खासदारांची संख्याही घटून शंभरीवर येईल, असा टोला पाटील यांनी लगावला. तसंच देशाची हलाखीची आर्थिक परिस्थिती, रुपयाचे अवमूलन, इंधनाचा भडका, महागाई, घटलेली परदेशी गुंतवणूक, वाढती बेरोजगारी, कर्जमाफीची फसवी आश्वासने, गॅस सबसिडी, आरक्षणाचे पोकळ दावे, अशा अनेक मुद्द्यांवर पाटील यांनी थेट भाष्य करत सरकारवर ताशेरे ओढले.

Most Popular

To Top