इतिहास

अपरिचीत रायगड…

रायगड म्हणजे मराठ्यांची अस्मिता. इथेच घडला तो सुवर्ण राज्याभिषेकाचा क्षण आणि इथेच चिरकाल विश्रांती मिळाली स्वराज्याच्या जाणत्या राजाला. याच रायगड वर अशा अनेक गूढ आणि अनाकलनिय गोष्टी आहेत, की ज्यांच्याविषयी आजही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यांच्याच मागोवा घेण्याचा प्रयत्न. १९७४ मधे रायगडावर शिवछत्रपतींच्या त्रिशताब्दी राज्याभिषेक सोहळ्यामुळे तब्बल २ लाख रुपये खर्चून साऱ्या गडाची साफ़सफाई करण्यात आली. यावेळेस अनेक वस्तू जसे चिलखत, गणेशमूर्ती, अलंकार इ. सापडले होते. याच उत्खननात बालेकिल्ल्याच्या पश्चिम भिंतीलगत एक खंदक सापडले. याच उत्खननात पुरातत्व खात्याला एका घराच्या जोत्यावर जळका उम्बरठा, चुल, ताटात वाढलेला भात (जळलेले) या गोष्टी मिळाल्या होत्या. पण पुरातत्व खात्याने त्यांना पुन्हा कधीच लोकांसमोर आणले नाही.

गडावर अनेक काचेची आणि चीनी मातीची भांडी मिळाली होती. या भांड्यावर चीनी लिपितील मजकूर आणि साभार भेट असे लिहीले होते.जेव्हा त्यातील भेटीच्या मजकुराचा उलगडा झाला, तेव्हा ती खुद्द छत्रपतींना दिल्याचे समोर आले. पण याविषयी ना कुठली माहिती समोर आली, ना अभ्यासकांना त्याचा अभ्यास करण्याची संधी दिली. सिंहासनाच्या उत्तर बाजूस खणताना ४२५ शिश्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या गोळ्या सापडल्या. रायगड अख्खा जळाला तरीही कर्नल प्रोथेरला तब्बल ५ लाख रुपये रोख मिळाले होते. आणि रायगडच्या अग्नीप्रलयातून एक घर आणि एक धान्यकोठार मात्र बचावले होते.पण ते कुठले? माहीत नाही. शिवछत्रपती आपल्या ५० वर्षे म्हणजे १८,३०६ दिवसांपैकी २०६० दिवस रायगडावर जगले. १८४६ मधे रायगडाच्या डोंगर परीसरात ‘मोत्यांचा?’ पाऊस पडला होता. आणि या गोष्टीची नोंदसुद्धा आपल्याला नाते येथील ‘देशमुखांची शकावली’ मधे पाहायला मिळते. आजही या गोष्टींची उकल व्हायची आहे. त्यात बऱ्याच गोष्टीत पुरातत्व खात्याने उत्कृष्ट घोळ घालून उगाच गुढपना आणला आहे. आजही रायगड अबोल आहे..

– अतुल अनंत मोरे

Most Popular

To Top