महासत्ता :- मी भारतात असुरक्षित वाटत असल्याचं कधीच बोललो नव्हतो असं ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे. मी फक्त भीती आणि काळजी व्यक्त केली होती. देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते असं वक्तव्य केल्याने नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका करण्यात आली होती. सोशल मीडियावरही युजर्सनी नसीरुद्दीन शाह यांना खडे बोल सुनावले होते. मात्र आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यता आला असून आपण तसं बोललोच नव्हतो असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.
‘मी फक्त माझ्या मुलांची नाही तर भारताच्या पुढच्या पिढीबद्दल मी चिंता व्यक्त केली. आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार केला पाहिजे. जो भेदभाव सुरु आहे, धर्मांमध्ये जो द्वेष आहे त्या सर्व गोष्टी गाढल्या पाहिजेत. मागे काय झालं हे न पाहता आपल्याला पुढचा विचार केला पाहिजे’, असं आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.
काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह –
या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे म्हणत नसीरुद्दीन शाह यांनी खंत व्यक्त केली होती. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं.