महाराष्ट्र

मराठी भाषा गौरव दिनी उलगडणार मराठी भाषेचा प्रवास आणि प्रवाह (विशेष लेख)


ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिन  राज्य शासनाकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यादिवशी राज्यभर मराठी भाषेच्या संवर्धन व विकासासाठी पूरक ठरतील असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यात  सर्व मंत्रालयीन विभाग व त्याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये यांनी भरभरून सहभाग घेतला.

राज्य शासनाकडून यादिवशी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार, श्री.पु.भागवत पुरस्कार, डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार असे चार विशेष पुरस्कार व साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार या पुरस्कारांबाबत विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे.

यावर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ व मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस ‘श्री.पु.भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. निवड समितीने यावर्षीच्या ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी’ ज्येष्ठ साहित्यिका, श्रीमती अनुराधा पाटील यांची तसेच ‘श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेची निवड केली आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस ‘भाषा संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार या वर्षी डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रा.आर.विवेकानंद गोपाळ व श्री.अनिल गोरे यांची निवड करण्यात आली आहे.

 या सर्वांचा थोडक्यात परिचय याप्रमाणे.

पद्मगंधा प्रकाशन, पुणे

महाराष्ट्र शासनाचा २०१९ चा श्री.पु. भागवत पुरस्कार पद्मगंधा प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. मराठी समाजमानस साहित्याच्या माध्यमातून समृद्ध करण्याचे काम जितके लेखकांनी केले आहे तितकेच विविध प्रकाशन संस्थांनीही केले आहे. गेली तीन दशके “पद्मगंधा प्रकाशन”ची नाममुद्रा मराठी ग्रंथव्यवहारात अतिशय ठसठशीत आणि स्पष्ट आहे. विविध प्रकल्प घेऊन काम करणे हे पद्मगंधाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. डॉ. रा चि. ढेरे यांच्या संशोधनाचे पुनर्व्यवस्थापन करून जुने व नवीन बावीस ग्रंथ प्रकाशित करणे, र.धों. कर्वे ह्या विसाव्या शतकातील एका द्रष्टया पुरुषाचे व्यक्तित्व व विचार आठ खंडात प्रकाशित करणे, श्री.व्य. केतकरांच्या कादंबऱ्या व समीक्षाग्रंथ, लावणी वाङ्मय व लोकसाहित्याचे विविध प्रकल्प, डॉ. गणेश देवी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय भाषांच्या लोकसर्वेक्षणातील महाराष्ट्रातील भाषांचा खंड, संशोधन व समीक्षा ग्रंथांचे प्रकल्प, विविध संप्रदाय, देवताविज्ञान, स्त्रीवादी साहित्य, दलित साहित्य, समाजशास्त्र, भाषाविज्ञान, ललित व विज्ञान साहित्य ‘पद्मगंधा प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे.

महाराष्ट्रातील नामांकित लेखकांबरोबरच अनेक नवीन व तरुण संशोधकांचे समीक्षाग्रंथ तसेच ललित साहित्यही पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. पद्मगंधा प्रकाशनाने अनुवादित पुस्तके प्रकाशित करताना केवळ लोकप्रिय अनुवाद प्रकाशित केले नाहीत तर जे वैश्विक साहित्यात पथदर्शी ठरले अशा प्रतिभावंत लेखकाच्या महान कलाकृती मराठीत आणल्या. परदेशी लेखकांप्रमाणेच अनेक भारतीय भाषातील लेखकाच्या साहित्यकृतीचे अनुवाद पद्मगंधाने मराठीत प्रसिद्ध केले.

पद्मगंधा प्रकाशनचे संस्थापक श्री. अरुण जाखडे हे स्वतः उत्तम संपादक व लेखक आहेत. त्यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकांनाही महाराष्ट्र शासनाचे व इतर संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारतीय भाषाचे लोकसर्वेक्षणह्या प्रकल्पातील योगदानासाठी श्री जाखडे यांचा डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते गौरव झाला आहे.

पद्मगंधा प्रकाशनच्या १२५ पेक्षा अधिक पुस्तकांना महाराष्ट्र शासन व इतर प्रतिष्ठित साहित्य संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर प्रकाशन संस्थेस मुंबई साहित्य संघ, ‘म.सा.प. पुणे. मराठवाडा साहित्य परिषद, फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, नवी दिल्ली व इतर काही संस्थाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

श्रीमती अनुराधा पाटील

श्रीमती अनुराधा पाटील यांना, महाराष्ट्र शासनाचा २०१९ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान होत आहे. आधुनिक मराठी कवितेचे दालन समृद्ध करण्यात त्यांच्या कवितेचा मोठा वाटा आहे.

१९५३ साली जळगाव जिल्ह्यातील पहूर या छोटेखानी गावात त्यांचा जन्म झाला. पहूर गावातच त्यांचे दहावीपर्यंतचे औपचारिक शिक्षण झाले. ऐंशीच्या दशकात मराठीतील प्रतिष्ठित नियतकालिकातुन त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या दिगंतकवितासंग्रहाने मराठी काव्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तरीही (१९८५), ‘दिवसंदिवस (१९९२),वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ (2015) आणि कदाचित अजूनही (2017) हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. याबरोबरच कथा लेखन  आणि अनुवादही त्यानी केले आहेत.

याबरोबरच त्यांनी काही कथा लिहिल्या तसेच अनुवादही केले आहेत. मात्र कवयित्री म्हणूनच मराठी साहित्यात त्यांची  स्वतंत्र ओळख अधोरेखित झालेली आहे. आधुनिक मराठी कवितेचे दालन समृद्ध करण्यात त्यांच्या कवितेचा मोठा वाटा आहे. १९८१ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या दिगंतकवितासंग्रहाने मराठी काव्यरसिकांचे लक्ष वेधून घेतले.

व्यापक जीवनानुभवासह स्त्रीकेंद्री दुःखाच्या महापटाचा शोध हे त्यांच्या एकूण काव्य संवेदनशीलतेचे केंद्रीय सूत्र राहिले आहे. दुःखानुभवाच्या विविध पैलूंसह, एकाकीपणा, परात्मता, सर्जनशीलतेचे सहोदरत्व, नात्यांचा शोध, मातृत्वबंध, मृत्यू आणि अतीताचा शोध या जाणीवसूत्रांनी त्यांची  कविता व्यापलेली आहे.

मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, महाराष्ट्र फाउंडेशन, बहिणाबाई चौधरी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहास २०१९ चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कवितांचे उर्दू, उडिया, पंजाबी, राजस्थानी, या भारतीय भाषांसह इंग्रजीतही अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. दरअसलया नावाने हिंदीत त्यांचा अनुवादित काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.

साहित्य अकादमीच्या भाषा सल्लागार मंडळ सदस्य तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

डॉ.अशोक केळकर

तंजावर येथून मराठी भाषेची पदविका घेतल्यानंतर पुण्यात मराठी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यानंतर, मध्ययुगीन मराठी भाषेचे अध्ययन व दोन वर्ष मोडी लिपीचे प्रशिक्षणही घेतले.

प्राचीन भारतीय इतिहास आणि भाषावैभव समजून घेताना दुर्मिळ हस्तलिखिते अत्यंत महत्वाचा ऐवज आहे. हे जाणून त्यानंतर गेली अनेक वर्षे या लिपीच्या अध्यापनाचे कार्य ते करत आहेत. त्यासाठी तंजावरच्या सुप्रसिद्ध सरस्वती महाल ग्रंथसंग्रहालयात मोडी आणि मराठी भाषा प्रशिक्षणाचे १२ अभ्यासक्रम तयार केले आहेत. तंजावरच्या या वाचनालयात मोडी भाषेतील अनेक दुर्मिळ हस्तलिखि साहित्याला एक समृध्द असा खजिनाच उपलब्ध करुन दिला आहे.

कुप्पमच्या द्रवितीयन विद्यापीठात गेली 11 वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच, मराठी आणि तमिळ या भाषेतील सेतू म्हणून ते काम करित आहेत. लावणी काव्यप्रकाराचा चिकित्सक अभ्यासया विषयात मराठी आणि तामिळ, अशा दोन्ही भाषांमध्ये अध्ययन करुन १९८७ साली युवराज तुळजेन्द्र राजा टी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मराठी अभ्यास परिषदेची त्यांनी स्थापना केली. मराठी शिकवण्याचे काम ते तीन दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे करत आहेत.

मोडी लिपीतील हस्तलिखितांच्या अनुवादासह, मराठी आणि तमिळ भाषेत त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. त्यात, शहाजी महाराज, मराठी पाळणा संग्रह, बिल्हण काव्य, लावणीचा इतिहास आणि विकास, क्षत्रिय मराठा कुळ आणि त्यांचे विभाजन असे अभ्यास ग्रंथ आहेत.  सिद्धहस्त विदुषी इरावती कर्वे यांचे युगान्तहे अजरामर पुस्तक, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक इयाम मनों यांनी अनुवादित केले. त्याशिवाय, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे (खंड 98) तीन भाग, डॉ जी. एम. पवार लिखित लेखक भालचंद्र नेमाडे यांचे टीका स्वयंवर, अरुण खोपकर यांचे चित्रपटविषयक लेखन चलत्-चित्रव्यूहअसे दर्जेदार कार्य ते करत आहेत. तमिळ साहित्यातील सुप्रसिद्ध ग्रंथ ‘थिसारळ’चा त्यांनी मराठीत अनुवादही केला आहे.

श्री.अनिल गोरे

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनिल श्रीपाद गोरे एक डोळस भाषांतरकार, जागरूक प्रकाशक आणि सजग कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत.

व्यवहारामध्ये मराठीचा अधिकाधिक उपयोग करता येण्यासाठी त्यांनी सरकार-दरबारी तसेच सामाजिक वर्तुळात नियोजनबद्ध कार्य केले.  २०१० पासून आतापर्यंत निरनिराळ्या बँकांमध्ये तब्बल ७ अब्ज कागद मराठीतून छापले गेले. तसेच शैक्षणिक, हजार पानांचे इंग्रजीतून मराठीत रूपांतर त्यांनी केले.

मराठीकरणाचा उपयोग सिद्ध करण्यासाठी मराठी माध्यमातील शिक्षणाचा राज्यभर प्रसार करण्याचे व्रत घेऊन समाजमाध्यमांच्या मदतीने त्यांनी अभिनव पद्धतीने जनजागृती केली. राज्यातील ३ लाख ११ हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून मराठी माध्यमात प्रवेश घेतला, हीच याची फलश्रुती होय !

ज्ञानभाषा म्हणून मराठीचे महत्त्व ठळक करण्यासाठी त्यांनी प्रकाशन व्यवसायात उतरून इयत्ता अकराव जीवशास्त्र आणि कृषीविज्ञान या विषयांच्या मराठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली. इतकेच नव्हे तर, आय. आय. टी.  नीटपरीक्षा, मराठीतून घेण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावाही यशस्वी झाला.

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

2010 (1 ला) श्रीमती विजया राजाध्यक्ष

2011 (2 रा) श्री.के.ज. पुरोहित

2012 (3 रा) श्री.ना.धो. महानोर

2013 (4 था) श्री. वसंत आबाजी डहाके

2014 (5 वा) प्रा. द. मा. मिरासदार

2015 (6 वा) प्रा. रा. ग. जाधव

2016 (7 वा) श्री. मारुती चितमपल्ली

2017 (8 वा) श्री. मधु मंगेश कर्णिक

2018 (9 वा) श्री. महेश एलकुंचवार

डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार

2015 (1 ला) श्रीमती मॅक्सीन बर्नसन

2016 (2 रा) श्रीमती यास्मिन शेख

2017 (3 रा) श्री. अविनाश बिनीवाले, पुणे

2018 (4 था) डॉ. कल्याण काळे

श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार

2008 (1 ला) पॉप्युलर प्रकाशन

2009 (2 रा) साकेत प्रकाशन

2010 (3 रा) मौज प्रकाशन

2011 (4 था) नवचैतन्य प्रकाशन

2012 (5 वा) मॅजेस्टिक प्रकाशन

2013 (6 वा) राजहंस प्रकाशन

2014 (7 वा) केशव भिकाजी ढवळे प्रकाशन

2015 (8 वा) कॉन्टिनेन्टल प्रकाशन

2016 (9 वा) भारतीय विचार साधना

2017 (10 वा) वरदा प्रकाशन

2018 (11 वा) साहित्य प्रसार केंद्र

कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार

2015 (1 ला) श्रीमती बेबीताई गायकवाड

2016 (2 रा) श्री. श्याम जोशी

2017 (3 रा) मराठी विज्ञान परिषद

2018 (4 था) डॉ. हरिश्चंद्र बोरकर

– अर्चना शंभरकर

वरिष्ठ सहायक संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

Most Popular

To Top