महाराष्ट्र

कोरोचीत तयार होतंय डॉक्टरांचे सुरक्षा कवच पीपीई किट !


कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणाचे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट ओळखले जाते. बाजारात भासणारी कमतरता पूर्ण करण्यासाठी युवराज घोरपडे यांनी इचलकरंजी जवळील कोरोची येथे उत्पादन सुरु केले आहे. यासाठी वापरण्यात येणारे 5 पदरी स्पन स्पन मेल्टब्लोन मेल्टब्लोन स्पन हे 60 जीएसएम नॉन ओव्हन कापड डीआरडीओ आणि मुंबई येथील प्रयोगशाळेने प्रमाणित केले आहे.

श्री.घोरपडे यांची युवा क्लोथींग कंपनी श्रीपाद गारमेंट कोरोची येथे आहे. याठिकाणी आठ वर्षांपासून ते उत्तम दर्जाच्या शर्टची निर्मिती करत आहेत. कोव्हिड-19 या विषाणूने जगाबरोबरच आपल्या देशात शिरकाव केला आहे. राज्यामध्ये याचे प्रमाण वाढलेले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्र मोठी जोखीम घेवून अशा रुग्णांवर उपचार करत आहे. आपल्या जिल्ह्यामध्येही कोव्हिड-19 संशयित आणि बाधित रुग्णांवर डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक आणि सहायक कर्मचारी मोठ्या धाडसाने आणि कर्तव्यनिष्ठेतून उपचार करत आहेत. मात्र या उपचारकर्त्यांचे सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाणाऱ्या पीपीई किटची बाजारामध्ये कमतरता आहे, हे वाचून युवराज घोरपडे यांनी कोरोची येथे संचारबंदीच्या काळात विशेष परवानगी घेवून पीपीई किटची निर्मिती सुरु केली आहे.

यासाठी लागणारे 5 पदरी स्पन स्पन मेल्टब्लोन मेल्टब्लोन स्पन हे 60 जीएसएम नॉन ओव्हन कापड हे तामिळनाडूमधील कोईमब्तूर येथून शासनाच्या निकषाप्रमाणे मागवले आहे. हे कापड मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवून त्याचे प्रमाणिकरण करुन घेतले. त्याचबरोबर दिल्ली येथील डीआरडीओ-आयएनएमएएस कडूनही नुकतेच प्रमाणित झाले आहे. याच कापडापासून 20 महिला आणि 10 पुरुष कामगारांच्या सहायाने सध्या दिवसाला 250 ते 300 किट तयार केले जात आहेत. या 5 पदरी कापडामुळे वॉटर रेफिलंट क्षमता ही बाजारात उपलब्ध असणाऱ्या 3 पदरी किटपेक्षा जास्त आहे. म्हणजे याच्यावर पाण्याचा शिडकाव केल्यास पलिकडच्या बाजूला पाणी जाणार नाही. जेव्हा एखादा रुग्ण शिंकतो त्या हवेच्या दाबाप्रमाणे जरी पाण्याचा शिडकाव केला तरी देखील ते पाणी शरिरापर्यंत पोहचणार नाही. अशी पूर्ण काळजी घेवून याची निर्मिती केली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होणार नाही. अशी माहिती श्री. घोरपडे यांनी दिली. लवकरच दिवसाला दीड हजार किट्स तयार करु, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

रेड झोनमधील बाधित रुग्णाच्या संपर्कात येत असाल तर हे एका दिवसासाठी घालून संध्याकाळी वेस्ट बॅगमध्ये घालून ते जाळून नष्ट करायचे आहे. रेड झोनमध्ये नाही, परंतु तपासणी, सर्व्हेक्षण वगैरे करत आहात अशा ठिकाणी एकदा वापरल्यानंतर हे किट 65 ते 70 अंश डिग्री सेल्सीअसला पाण्यात अर्धातास ठेवल्यास ते पुन्हा वापरात येवू शकते. त्याचबरोबर रुग्णालयात निर्जंतुकिकरण किंवा युव्ही लाईटमधून पास केल्यास हे किट पुन्हा वापरात येवू शकते, असा दावाही श्री. घोरपडे यांनी केला आहे. सध्या कापडाच्या प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. किटच्या शासनाकडून प्रमाणिकरणाची प्रक्रियाही आठवडाभरात पूर्ण होईल. सध्या मुंबईमध्ये दीड हजार किट पाठविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनालाही या किटचे प्रात्यक्षिक देण्यात आले आहे.

कोरोना बाधित आणि संशयितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे सुरक्षा कवच म्हणजेच पीपीई किट इचलकरंजीजवळील कोरोचीमध्ये तयार होत आहे. सध्या जिल्ह्याला मोठा दिलासा देणारी ही बाब आहे.

– प्रशांत सातपुते,
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

Most Popular

To Top