बार्शी : महासत्ता ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीची एक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख आहे. भगवंत मंदिर, कशास काशी, गया, अयोध्या जावे रामेश्वरी… असता श्रीहरी आमुचे घरी… असं बार्शीच्या भगवंताचं आणि त्याच्या महतीच वर्णन केलं जातं.
बार्शी या नावाची उत्पत्ती होण्याची अनेक करणे सांगितली जातात. पूर्वी या गावात बारा तीर्थे होती. बारा शिवमंदिरे असल्याचा उल्लेखही पुराणात आढळतो. त्यावरून बारा शिव, बारा बारस, बारशी आणि सध्या बार्शी असं नाव प्रचलित आहे.
भगवंत हा कोणत्याही नामाभिधानाशिवाय इथं स्वयंभू स्थापित आहे. गंडकी शिळेची शाळीग्राम मूर्ती पाहताक्षणीच विलोभनीय आणि लोभस वाटतं. भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीसह वास्तव्य केलेलं हे भगवंताचं मंदिर आहे.
भगवंताच्या मंदिराला पेशवेकालीन इतिहास
दरवर्षी आषाढी, कार्तिकी आणि माघी एकादशीला भगवंत मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलून जातं. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचं हे एक महत्वाचं ठिकाण आहे. उत्सव मूर्तीची ही नगरप्रदक्षिणा म्हणजे बार्शी शहरासह पंचक्रोशीचा जणू लोकोत्सवच असतो. यासाठी खास सजवलेल्या रथातून भगवंताची उत्सव मूर्ती हजारो भाविकांना पाहायला मिळते. मंदिरात दररोज काकडा आरती, महापूजा, धुपारती आणि शेजारती पार पडतात.
या मंदिरासाठी 1760 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी, 1823 साली ईस्ट इंडिया कंपनीने आणि ब्रिटिशांनी 1874 मध्ये सनदा देऊ केल्या. अंतिम सनदेनुसार सध्याचा मंदीराचा कारभार चालतो. मंदिराची व्यवस्था देवस्थान पंच कमेटी पाहते. तर पूजा-अर्चा नित्योपचार बडवे मंडळी करतात.
‘सर्व धर्म समभाव’ असं देवस्थान
एखाद्या गावाला जसा कारभारी म्हणून सरपंच असतो तसाच या मंदिराच्या प्रमुखाला सरपंच म्हणून ओळखलं जातं. पूर्वीपासून कालांतराने आवश्यक ते बदल मंदिराच्या बांधणीत आणि जीर्णोद्धारात होत आले आहेत. त्यामुळे मोठ्या तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त व्हावा, अशी मंदिर समिती आणि भाविकांची अपेक्षा आहे.
बार्शीचं भगवंत मंदिर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराशी साधर्म्य साधणारं आहे. केवळ मंदीराची रचनाच नव्हे तर अध्यात्मिक महत्वही पंढरीशी साधर्म्य साधणारं आहे. भक्त पुंडलिकाने जसा विठू भूलोकी आणला तसा राजा अंबरीषाने विष्णूला पृथ्वीतलावर यायला भाग पाडलं.
पंढरीच्या मंदिरासारखंच सोळाखांबी मंदीर आणि गरुड खांब मंदीराचं अध्यात्मिक आणि प्राचीन महत्व अधोरेखित करतात. पंढरपूरला जाणारा वारकरी हा भगवंताचा निस्सीम भक्त आहे. एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन द्वादशीला भगवंत दर्शनाने उपवास सोडायचा, अशी वारकऱ्यांची परंपरा आहे.
देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती असलेलं एकमेव मंदिर
भगवंतांनी घेतलेल्या दशावताराची शिल्पे मंदिराच्या शिखरावर कोरली आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतरलेल्या भगवंताची मूर्ती गंडकी शिळेच्या गुळगुळीत काळ्या पाषाणाची आहे. गर्भगृहातील ही मूर्ती विलक्षण दिसते. हातात शंख, चक्र, गदा आणि उजव्या हाताखाली भक्त शिरोमणी अंबरीश राजाची मूर्ती आहे.
देवाच्या अंगावर भक्ताची मूर्ती स्थापित असलेलं हे देशातलं एकमेव मंदिर आहे. देवाच्या पाठीशी लक्ष्मीची मूर्ती मुखवट्याच्या रूपात अस्तित्वात आहे. भगवंताच्या मस्तकावर शिवलिंग आहे. छातीवर भृगुऋषींच्या पावलांची खूण आहे. 1245 च्या सुमारास या मंदिराची उभारणी झाली, असं सांगितलं जातं.
हेमाडपंथी बांधकाम शैलीच्या या मंदिराच्या गाभाऱ्यासमोर गरुडखांब आहे. भगवंताच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक गरुडखांबाला प्रेमाने आणि श्रद्धेने आलिंगन देतो. नक्षिदार कलाकुसर असलेला मंदीराचा सभामंडप सुमारे दोनशे वर्षांपूर्वींचा असावा, असा अभ्यासकांचा कयास आहे.
मंदिरात दत्त महाराज, विठ्ठल रुख्मिणी, जोगा परमानंद, गणपती आणि काही पुरातण मूर्तीचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. धार्मिक आणि अध्यात्मिक महात्म्य लाभलेल्या भगवंतांच्या दर्शनाची आस प्रत्येक भाविकाला असते.
श्री भगवंतांची अख्यायिका
बार्शीच्या भगवंताची ख्याती जेवढी मोठी आहे, तेवढीच या क्षेत्राची अख्यायिका रंजक आहे. राजा अंबरीष नावाचा तपस्वी बार्शी पुण्य नगरीत वास्तव्याला होता. पुराणकाळात या अंबरीषाने अंगिरस ऋषींनी केलेल्या यज्ञात सहभाग घेऊन विद्वता आणि लोकप्रियता मिळवली.
12 वर्षे घोर तपस्या केल्याने त्याला भगवंताचे दिव्यज्ञान प्राप्त झाले. नारदमुनींच्या सांगण्यावरून त्याने साधनद्वादशीचं व्रत अंगिकारल. त्याच्या या कठोर साधनेमुळे इंद्राचे सिंहासन डळमळीत झाले. अशी आख्यायिका आहे.
इंद्रदेवाने दुर्वास ऋषींना अंबरीषाची साधना भंग करण्यासाठी पाठवले. अतिथी सत्कारात दोष शोधून दुर्वास ऋषींनी अंबरीषाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळणार नाही, असा शाप दिला. ऋषींनी क्रोधाने आपटलेल्या जटांमधून एका दैत्याचा जन्म झाला.
दैत्यापासून अंबरीषाचे रक्षण करण्यासाठी भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं आणि दैत्याचा संहार झाला. ऋषींनी अंबरीषाची क्षमा मागितल्यावर सुदर्शन शांत झाले आणि बार्शीतल्या उत्तरेश्वर मंदिरात विसावले, अशी अख्यायिका आहे.