महाराष्ट्र

प्रकल्पग्रस्त शेतकरी कै.धर्मा पाटील प्रकरणी अधिक मदत देण्याबाबत शासन सकारात्मक

मुंबई, दि. 6 : प्रकल्पग्रस्त शेतकरी कै. धर्मा पाटील यांच्या कुटुबियांना जमिनीचा उचित मोबदला देण्यात यावा. यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन झालेल्या नुकसानीबाबत अधिक मदत करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अध्यक्ष श्री.पटोले यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्त शेतकरी कै.धर्मा पाटील यांना न्याय देण्यासाठी आढावा बैठक झाली.

यावेळी ऊर्जा विभागाचे सहसचिव श्री.वाळूज, प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देताना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. याची दक्षता घेऊन त्यांना नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. शेजारच्या शेतकऱ्यांना मिळालेल्या मोबदल्याच्या तुलनेत नियमानुसार शेतकरी धर्मा पाटील यांनाही मोबदला देण्यात यावा. यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी आणि धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. असेही अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.‍

यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्त शेतकरी कै. धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना अधिक मदत मिळवून देण्याबाबत या आधीच्या बाबी तपासून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल व अधिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

नुकसानभरपाई देताना अन्यायकारक वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगून या प्रकरणाची योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असेही संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Most Popular

To Top