महाराष्ट्र

विधानसभा प्रश्नोत्तरे

राज्य परिवहन महामंडळात दुष्काळी भागातील

1250 उमेदवारांचे चालकपदाचे प्रशिक्षण सुरु

मुंबई दि. ११ : राज्य परिवहन महामंडळाने दुष्काळी भागातील तरूणांना नोकरी देण्यासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत १२ जिल्ह्यातून २४ हजार ५२६ विद्यार्थी उत्तीर्ण असून, १५ हजार ८५५ पात्र ठरले आहेत. ११ जिल्ह्यात १२५० वाहनचालक आणि वाहक पदाचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत दिली.

दुष्काळी भागातील तरूणांना राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील प्रश्न ॲड.आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ॲड. अनिल परब बोलत होते.

ॲड.परब म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाने फेब्रुवारी २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी परीक्षा घेतली. १२ जिल्ह्यांसाठी ४ हजार ४१६ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. २४ हजार ५२६ उमेदवार परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून, १५ हजार ८५५ उमेदवार गुणवत्तेनुसार पात्र ठरले आहेत. ११ जिल्ह्यात २३७२ पैकी १२५० उमेदवारांचे चालक पदाचे प्रशिक्षण सुरू आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील अंतिम यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

०००

प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करणार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६०७ उद्योगांपैकी ३११ कंपन्यांचा सर्व्हे केला असून, मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या ५० औद्योगिक कंपन्यांना नोटीस देण्यात आली असून, २१ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी बाहेर सोडण्यात येणाऱ्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले.

कल्याण-डोंबिवली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कारखान्यांमुळे होत असलेल्या वायू प्रदूषणासंदर्भात सदस्य गणपत गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.ठाकरे बोलत होते.

पर्यावरणमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोणत्याही औद्योगिक कंपनीमधून बाहेर पडणारे सांडपाणी हे प्रक्रिया होऊनच बाहेर सोडले जाणे सक्तीचे आहे. तसे न केल्यास संबंधित उद्योगांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेचे आधुनिकीकरण लवकरच करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी जे अनधिकृतपणे डम्पिंग करतात, ते रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पथक नेमण्यात आले आहे. याचबरोबर नगरविकास आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचीही माहिती मंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.

याचबरोबर मौजे शेलार येथील बेकायदेशीर कारखान्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबात शांताराम मोरे यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना मंत्री श्री. ठाकरे म्हणाले,  या परिसरातील दोन कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. दोन कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. चार उद्योगांना प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत. या कंपन्यात कामगार काम करत असतात त्यामुळे ते पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येते. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांनाच परवानगी देण्यात येते. तसेच, स्थानिक परिसरातून येणारे सांडपाणी आणि औद्योगिक कंपन्यांतून येणारे रासायनिक पाणी यावर प्रक्रिया करूनच हे पुढे जलस्त्रोतात सोडण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मौजे शेलार भागात ७ हजार बेकायदेशीर इमारती होत्या. अनधिकृत इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार नोटीस देऊनही जर कारवाई होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रविंद्र वायकर, योगेश सागर, सुनील प्रभु, रईस शेख, किसन कथोरे, मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

०००

श्रद्धा मेश्राम/11.3.2020

Most Popular

To Top