महाराष्ट्र

मांडव्याजवळील प्रवासी बोटीच्या अपघातात प्रसंगावधान राखत कार्यवाही; जीवितहानी नाही – मत्स्यव्यवसाय विकास मंत्री श्री. अस्लम शेख

अपघाताचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी

मुंबई, दि. १४ : मांडव्याजवळ आज सकाळी एक प्रवासी बोट समुद्रातील खडकास आदळल्याने पृष्ठभागास छिद्र पडून बोटीत पाणी येण्यास सुरुवात झाली. पण प्रसंगावधान राखत त्यावेळी गस्तीवर असलेली पोलीस बोट, ३ स्पीड बोटी व मागून येणारी एक बोट यांच्या मदतीने बोटीतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यात आले असून यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच बोटीच्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विकास मंत्री श्री. अस्लम शेख यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री श्री. शेख म्हणाले की, गेट वे एलिफंटा प्लेझर्स टुर्स अँड ट्रॅव्हल्स या संस्थेची अलफताह ही प्रवासी बोट ८५ प्रवासी आणि ५ खलाशांसह गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा येथे जाण्यासाठी निघाली. सकाळी सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास ही बोट मांडवा जेट्टीपासून ५०० मीटर अंतरावर असताना समुद्रातील खडकास आदळल्याने पृष्ठभागाला छिद्र पडून बोटीत पाणी येण्यास सुरुवात झाली. प्रसंगावधान राखत जवळपास असलेल्या बोटींना मोबाईलद्वारे व हाताने इशारा करण्यात आला. त्यावेळी सागरी गस्त करीत असलेली पोलिसांची सदगुरु ही बोट, ३ स्पीड बोटी व मागून येणारी ओशियन ग्लोरी ही बोट मदतीला आली. पोलीस बोटीवरील कर्मचारी व इतरांच्या मदतीने अपघातग्रस्त बोटीतील सर्व प्रवाशांना सुखरुप किनाऱ्यावर आणण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोटीवरील कागदपत्रांची तपासणी केली असता नोंदणी प्रमाणपत्र, सर्व्हे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे वैध असल्याचे आढळून आले आहे, असे निवेदनाद्वारे मंत्री श्री. शेख यांनी सांगितले.

००००

इर्शाद बागवान/विसंअ/दि.१४.०३.२०२०

Most Popular

To Top