महाराष्ट्र

शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे – आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

मुंबई, दि. 16 : छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे, हीच प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र या स्मारकाच्या उभारणीत जनतेचा पैसा लागणार असल्याने हे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला सचिव (बांधकामे) अजित सगणे यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

स्मारकाच्या कामाची सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन अशोक चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या निविदा प्रक्रियेवर कॅगने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. पर्यावरणासंदर्भात केंद्र शासनाकडून अनुमती मिळवताना विहित प्रक्रियेचे पालन झाले नसल्याच्या तक्रारी आहेत. स्मारक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात अजूनही शंका व्यक्त केल्या जात आहेत. यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व मुद्यांचे निराकरण तातडीने व्हावे; जेणेकरून स्मारकाच्या कामाला गती देता येईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या बैठकीत मांडली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या सर्व मुद्यांवर आपला अहवाल तयार करावा, असे निर्देशही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिले.

००००

Most Popular

To Top