महाराष्ट्र

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये – मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर

मुंबई, दि. 17 : मुंबई शहरात कोरोना ‍विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने या संदर्भात दिलेल्या सूचना विचारात घेता, मुंबई शहरातील सर्व धर्माच्या सार्वजनिक प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी होणारे सर्व सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, यात्रा/उत्सव अथवा गर्दी होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम दि. 31 मार्च, 2020 पर्यंत रद्द करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सिद्धीविनायक मंदिर न्यासाने भाविकांप्रती असणारे सामाजिक दायित्व लक्षात घेता पुढील सूचना मिळेपर्यंत ज्याप्रमाणे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच धर्तीवर इतर सर्व सार्वजनिक व धार्मिक आस्थापना यांनी अशा स्वरुपाचा निर्णय तातडीने लागू करावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

000

डॉ.राजू पाटोदकर/वि.सं.अ./17/03/2020

Most Popular

To Top