महाराष्ट्र

कृषि व पूरक उद्योगांशी संबंधित वाहतूक सुरळीत सुरू राहणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती


नाशिक, दि. 26 : कृषी संबंधित बियाणे, खते कापणी व वाहतूक यासंदर्भात कुठल्याही प्रकारची बंदी लॉकडाऊनमध्ये नसून या सर्व सेवा सुरळीतपणे चालू राहतील; सर्व शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी न करता व घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.


कृषीमंत्री श्री.भुसे आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाऊनमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी सुसंवाद साधला. यावेळी पत्रकारांशी झालेल्या संवादात श्री.भुसे यांनी खालील मुद्यांवर माहिती दिली.


  ·      प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन नंतर जनतेला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वत:ची आणि देशाची काळजी घेतली पाहिजे.

  ·      सद्य:स्थितीत घाबरुन जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती नसून नागरिकांनी शासन, प्रशासनास समन्वय व सहकार्य केल्यास या कोरोनाच्या संकटाचा आपण सक्षमपणे मुकाबला करु शकतो.

  ·      जिल्ह्यात कलम 144 लावल्यानंतर शेती संबधित बियाणे व खते व्यवसाय, शेतीपूरक उद्योगव्यवसाय यांची वाहतुकीत काही अडथळे निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

  ·      शेतीविषयक कुठल्याही कामकाजाच्या वाहतुकीत अडथळा येणार नाही या संदर्भात प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

  ·      प्रत्येक आरटीओने जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ऑनलाईन परवाने व स्टीकर देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचा लाभ सर्व संबधितांनी घ्यावा.

  ·      संपूर्ण देशभर अशा प्रकारची वाहतूक अत्यावश्यक कामांसाठी सुरु आहे.

  ·      कृषी मालवाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या मुंबई, पुणे या जिल्ह्यांच्या सेवा सुरु राहतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

  ·      आवश्यकतेनुसार मालाचा पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

  ·      नागरिकांनी सोशल डिस्टन्सीच्या नियमांचे काटेकारेपणे पालन करावे.

  ·      भाजीपाला, फळे  विक्रेत्यांकडे गर्दी करु नये.

  ·      चार ते पाच व्यापारी मिळून आपला माल एकत्र करुन नागरिकांना सोशल डिस्टन्सी राखून विकण्यावर भर द्यावा.

  ·      शेतकऱ्यांनी/व्यापाऱ्यांनी एकाच बाजारात गर्दी न करता वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मालाची  विक्री  करावी.

  ·      काही द्राक्षे निर्यात झाली आहेत व काही काढणीला आहेत यासंदर्भात द्राक्षे बागायतदार महासंघाशी व शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून त्यांचे कंटेनर्सद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास दिले आहेत.

  ·      स्थानिक पातळीवर द्राक्ष वाहतूक करण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे.

  ·      महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आवाहन आहे की, अन्न धान्य, भाजीपाला, फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याला घाबरुन जाण्याचे व काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही.

  ·      कुठल्याही  प्रकारची  साठेबाजी  करु  नका.

  ·      जेवढ्या जीवनावश्यक वस्तुंची आवश्यकता आहे तेवढ्या  वस्तू उपलब्ध करुन दिल्या जातील.

मालेगांवातील प्रकार दुर्देवी;संबंधितांवर कठोर कारवाईच्या सूचना

यावेळी बोलतांना कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले की, काल मालेगांवात काही नागरिकांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार केला आहे, हा प्रकार अत्यंत दुर्देवी असून आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, आपत्तीच्या कामात सर्वच विभाग अत्यंत सचोटीने काम करत आहेत. या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

यावेळी खासदार डॉ.भारती पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, माजी आमदार अनिल कदम, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंह, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

Most Popular

To Top